पुणे : महावितरणने सुरु केलेल्या वीजदेयकांच्या ऑनलाईन भरणा सुविधेला पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. सन २०१४ मध्ये पुणे परिमंडलातील ३५ लाख २९ हजार ६३९ वीजग्राहकांनी ऑनलाईनद्वारे तब्बल ४६० कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजबीलांचा भरणा केलेला आहे. दरम्यान, एटीपी (एनी टाईम पेमेंट) या मशीनच्या माध्यमातून पुणे परिमंडलात गेल्या वर्षभरात ९ लाख ३२ हजार १५० ग्राहकांनी १७९ कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा महावितरणने आपल्या ग्राहकांना घरबसल्या वीजदेयक भरता यावे यासाठी ऑनलाईन पेमेंट, एसएमएसद्वारे वीजबील भरणे, शिवाय रांगेत उभे न राहता एटीपी (एनी टाईम पेमेंट) मशीनच्या मदतीने वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटची सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी वीजदेयके ऑनलाईन भरण्याच्या सुविधेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महावितरणने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजबील भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड किंवा नेटबंॅकींगद्वारे वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पुणे परिमंडलात सन २०१३ मध्ये २८ लाख ३१ हजार ७९५ वीजग्राहकांनी ३५६ कोटी ७८ लाख रुपयांचा ऑनलाईन वीजदेयकांचा भरणा केला होता. या तुलनेत ऑनलाईन वीजदेयके भरणार्या ग्राहकांची संख्या सन २०१४ मध्ये ३५ लाख २९ हजारांवर गेली आहे. तसेच ऑनलाईन रकमेचा भरणाही ४६० कोटी रुपयांवर गेला आहे. पुणे परिमंडलाची ही संख्या सलग दोन्ही वर्षात राज्यात सर्वाधिक आहे. महावितरणने पुणे परिमंडलातील शहरी भागांत २० एटीपी मशीन्स बसविलेल्या आहेत. सन २०१४ मध्ये पुणे परिमंडलात ९ लाख ३२ हजार १५० वीजग्राहकांनी या मशीन्सच्या माध्यमातून १७९ कोटी ३३ लाख रुपयांच्या वीजबीलाचा भरणा केलेला आहे.