पुणे : महावितरणच्या ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह पुणे परिमंडलातील 6 लाख 59 हजार 133 वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्ग (सेंट्रलाईज कस्टमर केअर सेंटर) मध्ये नोंदणी केली आहे. गेल्या महिनाभरात तब्बल 60,905 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली आहे.
महावितरणकडून विविध ग्राहकसेवांसह वीजग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती सध्या प्रायोगिक तत्वावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्वच वीजग्राहकांना वीजबिलाचा एसएमएस पाठविण्यात येत आहे. याशिवाय इमेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना इमेलद्वारे वीजबिल पाठविण्यात येत आहे.
महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर एसएमएसद्वारे वीजग्राहकांना स्वतःचा इमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी 9225592255 क्रमांकाला MERG (बारा अंकी ग्राहक क्रमांक)(वीजग्राहकाचा इमेल) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास इमेल आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MERG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे.
याशिवाय महावितरणच्या 24X7 सुरु असणार्या कॉल सेंटरचे 18002003435 आणि 18002333435 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. भाषेची निवड केल्यानंतर सहा अंक दाबल्यानंतर कॉल सेंटरमधील ग्राहक प्रतिनिधीशी थेट संपर्क होतो.
यानंतर वीजग्राहकांना स्वतःच्या वीजग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक ग्राहक प्रतिनिधींना सांगून ते रजिस्टर्ड करण्याची सोय आहे. कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपवर ऑनलाईन बील भरणा करणार्या वीजग्राहकांनाही संपर्क क्रमांकाची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पुणे परिमंडलात आतापर्यंत 6 लाख 59 हजार 133 वीजग्राहकांनी संपर्क क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. यात सर्वाधिक पिंपरी विभागात 99089 संपर्क क्रमांकाची नोंदणी झालेली आहे. तसेच कोथरूड- 79588, भोसरी- 51849, बंडगार्डन- 85305, शिवाजीनगर- 53857, नगररोड-56923, पद्मावती-60459, पर्वती -73993, रास्तापेठ-51822 तर मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागांत एकूण 46,248 वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणमध्ये नोंदणी केलेल आहे.