पुणे:
कला, संस्कृती, गायन, वादन आणि नृत्य यांचा मिलाफ असणार्या व पुणेकरांच्या नवरात्र महोत्सवाचे खास आकर्षण असणार्या ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’ला २५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती उपमहापौर व महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवानिमित्त यंदाचा श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार दै. पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे (पत्रकारिता), अभिनेते अनंत जोग (चित्रपट), प्रकाश मोहन मुलाबागल (उच्च शिक्षण), दीपाली सय्यद (लावणी), डॉ. नितीन बोरा (सामाजिक क्षेत्र), मोतीलाल निनारिया (सामाजिक) यांना प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
महोत्सवाचे यंदा २0 वे वर्ष असून, येत्या गुरुवारी या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाचे उद््घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे दि. २५ रोजी सायं, पाच वाजता अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आ. उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, मनपा आयुक्त कुणाल कुमार आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
दहा दिवस चालणार्या या महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती देताना बागूल म्हणाले की, घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ७.३१ वाजता श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना होणार आहे. यावेळी मंदिराचे सुशोभिकरण फुलांच्या माळांनी व आक र्षक विद्युत रोषणाईने करण्यात येणार आहे. याच दिवशी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना कला संस्कृती पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
महोत्सवाच्या आयोजनात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागूल, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख राजेंद्र बागूल व राजेंद्र बडगे यांचा पुढाकार आहे. महोत्सवाच्या उद््घाटन समारंभाचे निवेदन सुधीर गाडगीळ करणार असल्याचे महोत्सवाचे सदस्य अमित बागूल नंदकुमार बानगुडे यांनी सांगितले.
पुणे नवरात्रौ महोत्सव गुरुवार दि. २५ पासून
Date: