पुणे :
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्व माहिती एका क्लिक वर उपलब्ध करून देणाऱ्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘पी डी सी सी बँक ‘ या मोबाईल एप्लिकेशन चे लॉचिंग माजी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित पवार यांच्या हस्ते झाले.
शनिवारी सकाळी पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा ) येथे हा कार्यक्रम झाला . हे अॅप प्लेस्टोर वर मोफत उपलब्ध असून ‘पी डी सी सी बँक ‘ (pdcc bank )नावाने शोधल्यास सहज डाउनलोड करता येईल. तसेच मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
माहिती -तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मिडियाच्या या युगामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही नवनवीन बदल घडवत आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याबरोबरच अधिक अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अद्ययावत योजना व सुविधाबरोबरच अद्ययावत तंत्रज्ञान द्वारे लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अॅप द्वारे केला जाणार आहे. या अॅप द्वारे ग्राहकांना घरबसल्या सर्व योजना त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि संबंधित विभागाचे संपर्क उपलब्ध होणार असून यासाठी वारंवार बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. याद्वारे “बैंक आपल्या दारी” पोहचण्यास मदत होणार आहे.,असे यावेळी सांगण्यात आले
या कार्यक्रमावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात, उपाध्यक्ष सौ अर्चना घारे, संचालक दिलीप वळसे -पाटिल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोसले तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.