सुभाष हनुमंत डांगे (वय 50, रा. माधवनगर, सांगली) व सुनंदा तानाजी काकडे (वय 45, रा. चेंबूर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. सुशीला संजय डांगे (वय 45), अनुष्का संजय डांगे (वय 18) आणि हेमलता हनुमंत डांगे (वय 70, सर्व रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) व अर्चना सुभाष डांगे (वय 17, रा. माधवनगर, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण सातारा येथून कात्रज येथे आले होते. कात्रज बस स्थानकातून ते कोथरूडला लग्न समारंभाला जाण्यासाठी बसची वाट पाहात होते. याप्रकरणी संजय डांगे (रा. गोळीबार मैदान, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी चालक वसंत आबासाहेब गायकवाड (वय 39, रा. आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.
या चालकाने कात्रज येथून निगडीकडे जाणारी बस सुरू केली. त्या वेळी ब्रेक निकामी झाल्यामुळे वेगाने पुढे आलेल्या बसने काही अंतरावर थांबलेल्या प्रवाशांना चिरडले. त्यात सुनंदा काकडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुभाष डांगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला घेत महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला, तसेच रिक्षाचालक, कात्रजच्या अजिंक्य भैरवनाथ मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि कात्रज पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी बसखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. चालकाला बसवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले