सातारा (जिमाका) : पिंपोडे ब्रुद्रुकच्या ग्रामस्थांनी खास करुन जनकल्याण समितीच्या माध्यमातून जलक्रांती करुन टंचाईला मुक्ती दिली आहे. त्याच धर्तीवर घीगेवाडी येथेही जलक्रांती करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी काल कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे ब्रुद्रुक येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी अचानकपणे केली. यावेळी बंधाऱ्यात झालेल्या पाणीसाठा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. घिगेवाडी येथेही नारळ मागवून घेत तेथील ब्रिटीशकालीन बंधाऱ्याचे पुनर्जीवन करण्याच्या कामाचा शुभारंभ श्री. मुद्गल यांनी केला. यावेळी सरपंच मच्छिंद्र केंजळे, जनकल्याण समितीचे विजयराव पंडीत, डॉ. अविनाश पोळ, यांत्रिकी विभागाचे प्रकाश भोसले, मंडल अधिकारी उमेश डोईफोडे, भास्कर घिगे, बाळसाहेब घिगे, शामराव साळुंखे, लालासाहेब निकम, उद्धव निकम आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे ब्रिटीशकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती व त्याचबरोबर खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. आहे. सध्या या बंधाऱ्यामध्ये मोठा पाणीसाठा झालेला आहे. या कामाची पहाणी श्री. मुद्गल यांनी काल अचानकपणे भेट देऊन केली. यावेळी आनंद व्यक्त करुन ते म्हणाले, ब्रिटीशकालीन असणाऱ्या बंधारा दुरुस्तीचे काम पिंपोडे ग्रामस्थ, जनकल्याण समिती यांनी हाती घेतले. अत्यंत सुंदर पद्धतीने हे काम झालेले आहे. या बंधाऱ्यामध्ये 600 ते 700 मिटर किमान पाणीसाठा सध्या झालेला आहे. यामुळे गावातील विहिरी, विंधन विहिरी या पुनर्जीवीत झाल्या आहेत. याचे सर्व श्रेय पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थांना जाते. या ग्रामस्थांनी केलेल्या जलक्रांतीमुळे गावात असणाऱ्या टंचाईला आता मुक्ती मिळणार आहे.
यानंतर त्यांनी घिगेवाडी येथे असणाऱ्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्याची पाहणी केली आणि या बंधाऱ्याच्या दरुस्तीचे तसेच खोलीकरण, रुंदीकरणाचे आदेश यांत्रिकी विभागाला दिले. या ठिकाणी नारळ मागवून घेत या बंधाऱ्याच्या पुनर्जीवन कामाचा शुभारंभही तात्काळ करुन ग्रामस्थांना सुखद धक्का दिला. या कामामुळे घिगेवाडीसह वाघोली परिसरातील भूजल पातळी वाढण्यासाठी निश्चिपणे मदत होणार आहे. या प्रसंगी सुनील निकम, रणजीत निकम, सूर्यकांत निकम, राजेंद्र निकम, आदीनाथ सावंत, संभाजी लेंभे, बाळासाहेब कदम, प्रमोद खराडे, शरद लेंभे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंपोडे ब्रुद्रुक ग्रामस्थांच्या जलक्रांतीने टंचाईला मुक्ती -अश्विन मुद्गल
Date:

