पुणे- 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 15 ते 18 जानेवारी दरम्यान पिंपरीतील हिंदुस्थान अॅण्टीबायोटिक्स (एचए) मैदानावर भरणार आहे. संमेलनाचे उद्घाटन 16 जानेवारी रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रथम ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
माधवी वैद्य यांनी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला. 15 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता ग्रंथदिंडी निघणार असून दिंडीचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्ञानेश्वर मुळे, गिरीश प्रमुणे आणि डॉ. रामचंद्र देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी पावणेपाच वाजता डॉ. माधवी वैद्य आणि पी. डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता ग्रंथप्रदर्शनाचे 88 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन 16 जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ गीतकार गुलझाल, पालकमंत्री गिरीश बापट, सदानंद मोरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, केदारनाथ सिंह, सीताकांत महापात्र हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनामध्ये विविध विषयांवरील 11 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्योगनगरीत संमेलन भरत असल्यामुळे ‘मराठी साहित्यातील उद्योगजगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय अभिजात कथावाचन, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत लेखकांशी संवाद, बहुभाजिक कविसंमेलन, ज्येष्ठ गायिका आशा भोसले संगीत रजनी, तरुणांसाठी खास चेतन भगत यांच्याशी संवाद, मुलांसाठी मामाच्या गावाला जाऊया या कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह गुलझार, शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या मुलाखती होणार असून उपस्थितांना संदीप वासलेकर, ज्ञानेश्वर मुळे, श्रीनिवास दैठणकर, अच्युत गोडबोले यांच्याशी संवाद साधता येणार आहे.
संमेलनाचा समारोप 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे आणि ज्येष्ठ कवी व गीतकार जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप समारंभानंतर अशोक हांडे निर्मित मंगलगाणी-दंगलगाणी कार्यक्रम होणार आहे.