पुणे, दि. 26 : पिंपरी विभागअंतर्गत वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 37 ठिकाणी 1,24,900 युनिटची म्हणजे 16 लाख 78 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे महावितरणच्या महिला अभियंत्यांनी या मोहिमेतील पथकांचे नेतृत्व केले.
पिंपरी विभागातील पिंपरी गाव, दापोडी, थेरगाव, सांगवी, हिंजवडी, रहाटणी, पिंपळे निलख आदी परिसरातील सुमारे 140 घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजमीटरची दि. 23 व 24 नोव्हेंबरला तपासणी करण्यात आली. यासाठी 13 पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात अभियंता, लेखा लिपिक व दोन जनमित्र अशा चार जणांचा समावेश होता.
वीजमीटरच्या तपासणीत चिंचवड- 6, खराळवाडी- 18 आणि सांगवी उपविभागात 13 अशा 37 ठिकाणी 1,24,900 युनिटच्या 16 लाख 78 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. याआधी ऑक्टोबरमध्ये वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत खराळवाडी, चिंचवड, सांगवी उपविभागातील 42 ठिकाणी 16 लाख 85 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली होती. वीजचोरीप्रकरणी संबंधीतांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धनंजय औंढेकर, सहाय्यक अभियंता शैलजा सानप, वहिदा बागवान, स्मिता ओहोळ, सुरेखा पोळ, सुरेखा भारती, निवेदिता पाटील, ऐश्वर्या वस्त्रद, सुप्रिया जोशी व कार्यालयीन सहाय्यक दिपाली झापर्डे, पुजा गजघाटे आदींसह सुमारे 65अभियंता, कर्मचारी, जनमित्र या मोहिमेत सहभागी झाले होते.

