पालिकेतील अधिकाऱ्यांचे सोशल ऑडिट करा “सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’ ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे :
ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीसाठी धावपळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेतील सर्वच अधिकाऱ्यंाच्या कामांचे, कार्यकाळाचे “सोशल ऑडिट’ करावे, अशी मागणी “सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’ ने केली आहे. संस्थेच्या वतीने अध्यक्ष दीपक बिडकर, सचिव ललित राठी यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुणे महानगरपालिकेत अनेक अधिकारी आपल्या पदांवर वर्षानुवर्षे चिकटून आहेत. काही अधिकारी राजकीय व्यक्तींचे नातेवाईक, निकटवर्तीय म्हणून वावरतात, तर काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू न होता मूळ खात्यात काम करत राहतात. या सर्व प्रशासकीय अनागोंदीचे “सोशल ऑडिट’ करून आयुक्तांना तो जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, असे या पत्रात म्हटले आहे.
“राजकीय पदाधिकाऱ्यांनी कार्यक्षम अधिकाऱ्यांना कामाची मोकळीक द्यावी, हितसंबंधांसाठी शहर हिताला वेठीस धरू नये’ असेही आवाहन संस्थेने पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना केले आहे.