पुणे, दि. 27 – पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान मार्गावर वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढावीत, रस्ते दुरूस्ती करावी तसेच पालखी तळावर वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज झालेल्या समन्वय बैठकीत दिल्या.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे झालेल्या या बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, देहू आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ हटवली जावीत. त्यासाठी महसूल, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्त मोहीम राबवावी. पालखी मार्गावरील खड्डे बुजवावे. जेथे आवश्यक आहे तेथे रस्त्यांची दुरूस्ती करावी. रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे काम देखील करून घ्यावे जेणेकरून वारकरी यांना चालताना त्रास होणार नाही.
पालखी विसावा आणि तळावर आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जाव्यात. त्यासाठी राज्य शासनाच्या तिन्ही जिल्हापरिषदांचे आरोग्य विभाग यांनी एकत्रित सुविधा पुरवाव्यात. सोलापूर जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याजागी पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागांशी संपर्क साधावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. वारकऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा पुरवितानाच बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जावी. त्यासाठी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. त्याचबरोबर पालखी मार्गावर रूग्णवाहिका उपलब्ध ठेवा असेही पालकमंत्री बापट यांनी सांगितले.
पालखी मार्गावर, विसाव्याच्या ठिकाणी आणि पालखीच्या तळावर स्वच्छता राखली जाईल याची काळजी संबंधित जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना पालकमंत्री बापट यांनी दिल्या. त्याचबरोबर दिंडीना तिन्ही जिल्ह्यात वापरता येईल, असे एकच शिधापत्रिका वितरित करा. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल आणि अन्न पदार्थांच्या विक्रीच्या स्टॉलची पाहणी अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे केली जावी, असे आदेशही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
तिन्ही जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांनी पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवावा, वाहतुकीचा वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यक तो ट्रॅफिक प्लॅन बनवावा, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. सासवड येथून निघणाऱ्या संत सोपानदेव महाराजांच्या पालखीसोबत पाण्याचा टँकर आणि पोलीस संरक्षण पुरवावे, असेही त्यांनी पोलीस विभागाला सांगितले.
पालखींच्या पुर्वतयारीबाबत प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेण्यात आली असून त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले. तिन्ही जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांचे नाव आणि त्यांच्या संपर्क क्रमांकाची पुस्तिका तयार करण्यात येणार असून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडी प्रमुखांना वितरित केली जाईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव, तुकाराम मुंडे आणि अश्विन मुदगल यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती आणि अतिक्रमण हटावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.
पालखींच्या प्रस्थानानुसार जलसंपदा विभागाने इंद्रायणी नदीपात्रात आणि कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर अशा तिन्ही जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश कपोले यांनी सांगितले.
बैठकीस पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार सर्वश्री दिलीप सोपल, लक्ष्मण जगताप, दत्तात्रय भरणे, ॲड. राहुल कुल, महेश लांडगे, जगदीश मुळीक, संजय ऊर्फ बाळा भेगडे त्याचबरोबर देहू आणि आळंदी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, पुरवठा विभागाचे उपायुक्त प्रकाश कदम, अन्न औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त शशिकांत केकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.वाय.पाटील आदी उपस्थित होते.
पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढा- पालकमंत्री गिरीश बापट
Date: