पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अमृत महोत्सवी वर्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचेही अमृतमहोत्सवी वर्ष तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्मदिवस या सर्वांच्या एकत्रित योगाने आज सकाळी ‘पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन ऐतिहासिक शनिवारवाडा येथे आज सकाळी शरद पवार यांच्या हस्ते स्टार्ट फ्लॅग फडकावून झाले. या उद्घाटन प्रसंगी श्री. पवार म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण आणि आपले शारीरिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. आज या स्पर्धेनिमित्त पुणे ते बारामती रस्त्याच्या दुतर्फा उभे राहणाऱ्या लोकांना स्पर्धकांकडून या दोन्ही गोष्टींसाठी महत्त्वाची प्रेरणा मिळणार आहे.
या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण ,अश्विनी कदम ,विशाल तांबे ,अप्पा रेणुसे ,चंचला कोद्रे ,रवींद्र माळवदकर उपस्थित होते यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेला भारताच्या ११ राज्यातून आलेले स्पर्धक तसेच पुणे विद्यापीठात शिकणारे परदेशी विद्यार्थीही सहभागी झाले आहेत.