मुंबई : ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, आपल्याच जीवनासाठी’ या संकल्पनेतून वन विभागाच्या वतीने तयार केलेल्या ‘पर्यावरण दिनविशेष’ या पुस्तकाचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, वन विभागाचे सचिव विकास खारगे उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी जगभर साजरा केल्या जाणाऱ्या विविध विशेष दिनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. शासनाने नुकतेच पर्यावरणाचे राजदूत जाहीर केले आहेत, त्यामध्ये राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरोळी, राज्य फळ आंबा, राज्य फूल जारूळ आणि राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन यांचा समावेश आहे. या पुस्तकामध्ये या पर्यावरणदूतांबाबत माहितीही देण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये जागतिक पातळीवर साजरा होणाऱ्या दिन विशेषांची माहिती दिली असून पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करु शकतो, याचीही माहिती देण्यात आली आहे.