परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प असण्याची गरज – नितीन गडकरी
घरे परवडण्यासाठी करात सवलत देण्याची क्रेडाई ची मागणी
नागपूर : सर्वसामान्य जनतेसाठी बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती घ्यावेत. त्यासाठी व्यावसायिकांनी बांधकामातील दर्जा ढळू न देता नवनवीन आणि सशक्त प्रयोगांचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून बांधकाम खर्च कमी होईल असे आवाहन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ‘क्रेडाई- महाराष्ट्र’च्या नागपूर येथील त्रैमासिक बैठकीमध्ये व्यावसायिकांना केले. तसेच त्यासाठी लागणाऱ्या शासकीय परवानग्या लवकर मिळविण्यासाठी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यावेळी त्यांनी दिले.
क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली क्रेडाईची त्रैमासिक बैठक नुकतीच नागपुरमध्ये पार पडली. मुल्यवर्धित आणि मुद्रांक शुल्क व इतर कर हे साधारणतः घराच्या किमतीच्या ११.५% पर्यंत होतात. जर सरकारने अशा करांमधून परवडणाऱ्या घरांना सूट दिल्या तर घरांच्या किमती कमी होतील, तसेच गृहकर्जावरील व्याजदर कमी केल्यास ते गरजूं लोकांच्या आवाक्यात येईल या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
क्रेडाई महाराष्ट्राचे एकूण ३९ शहर संघटनांपैकी ३३ शहर संघटनांचे २५० हून अधिक सभासद या बैठकीत उपस्थित होते. क्रेडाई महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रशांत सरोदे, वरिष्ठ उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया (पुणे), महेश साधवानी मानद सचिव यांनी उपस्थित सभासदांशी संवाद साधला व त्यांच्या बांधकाम विषयीच्या समस्यांवर चर्चा करून मार्गदर्शन केले.