पुणे-– घरगुती वादातून पत्नीचा धारधार चाकूने गळा कापून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवारी) पुण्याजवळील रहाटणी गावातील राम मंदिराजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडली.
संतोष दत्तात्रय थोपटे (वय ३४, रा. राम मंदिराजवळ, रहाटणी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून साधना संतोष थोपटे (वय ३०, राम मंदिराजवळ, रहाटणी) असे दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. आई, वडील, लहान भाऊ आणि एक सहा वर्षाची मुलगी असा संतोषचा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष व साधना यांमध्ये नेहमी वाद होत असे, आज सकाळी सहाच्या सुमारास वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात संतोषने त्याची पत्नी साधना हीचा चाकूने गळा कापला व स्वतः बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
दरम्यान संतोषने मरण्यापूर्वी चिट्ठी लिहली असून “या सर्वाला मी जबाबदार आहे, माझ्या मरणानंतर कोणालाही त्रास होऊ नये” असे त्यात लिहिले आहे. जखमी साधनावर थेरगाव मधील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमृत मराठे अधिक तपास करत आहेत.