मुंबई- विशिष्ट लोकांना टेंडर देण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने गैरप्रकार करवून सुमारे २१० कोटीची खरेदी केल्याचा आरोप आता होतो आहे
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एकाच दिवसात २४ आदेश काढून सर्व नियम धाब्यावर बसवत २०६ कोटींची चिक्की, डिशेस, चटई आणि पुस्तकं खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, पंकजा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुश्री गुंड यांनी १५ जून रोजी महिला व बालकल्याण मंत्रालयाला एक पत्र लिहून ‘आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चिक्कीत माती आहे. ती खाण्यालायक नाही. याप्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी’, अशी मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असता चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ‘द न्यू इंडियन एक्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, ३ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे साहित्य खरेदी करायचे असल्यास ई-निविदा काढणे आवश्यक असतानाही हा नियम पायदळी तुडवून कोणत्याही निविदेशिवाय एका दिवसात २०६ कोटींची खरेदी करण्यात आली.
१३ फेब्रुवारी या एकाच दिवसात ही खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी पंकजा यांच्या मंत्रालयाने तब्बल २४ आदेश दिवसभरात काढले. तशी नोंदच राज्य शासनाच्या रेकॉर्डला आहे. ३७ कोटींचं चिक्की पुरवण्याचं कंत्राट मागणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सूर्यकांता सहकारी महिला संस्थेला तब्बल ८० कोटींचं कंत्राट देण्यात आलं. हा खर्च ३ लाखांपेक्षा मोठा असल्याने केंद्रीय खरेदी आयुक्त राधिका रस्तोगी यांनी ई-निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यात पंकजा यांनी हस्तक्षेप करून हे कंत्राट सूर्यकांता महिला संस्थेला दिलं. विशेष म्हणजे या संस्थेकडे चिक्की बनवण्यासाठी स्वत:चा कोणताही प्रकल्प नसतानाही या संस्थेवर महेरबानी दाखवण्यात आल्याचा दावा या दैनिकाने केला आहे.
नवी मुंबईतील जगतगुरु प्रिंटिंग प्रेसकडून ५ कोटी ६० लाखांची वह्यापुस्तकांची खरेदी करताना या रक्कमेचा धनादेश प्रेसच्या नावे न काढता प्रेसचे मालक भानुदास टेकवडे यांच्या नावाने काढण्यात आला. नाशिकच्या एव्हरेस्ट कंपनीकडून करण्यात आलेल्या वॉटर फिल्टर्सच्या खरेदीतही अशीच मेहेरबानी करण्यात आली. फिल्टरची किंमत ४ हजार ५०० रुपये असताना त्यासाठी ५ हजार २०० रुपये मोजण्यात आले. ही कंपनीही स्वत: फिल्टरचं उत्पादन करत नाही. याशिवाय कुपोषित मुलांचं मॉनिटरिंग करणाऱ्या मशिन्स खरेदी करण्याचं २४ कोटींचं कंत्राट निविदेविना साई हायटेक आणि नितीराज इंजिनिअर्स या उत्तर महाराष्ट्रातील कंपन्यांना देण्यात आलं. औषधांच्या एका किटसाठी ५०० रुपयाची तरतूद आहे, पण कंत्राटदाराने ७२० रुपये किंमत लावली. ही बाब उघड होऊ नये म्हणून किटमधील औषधांची संख्या कमी करण्याची शक्कल पंकजा यांच्या खात्यानं चालवल्याचंही समोर आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाची काँग्रेसने कागदपत्रांनीशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय माकन यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणात आणखी कोणी मंत्री आहे का? याचाही तपास व्हायला हवा, असे माकन म्हणाले.दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ही संपूर्ण खरेदी केंद्र सरकारच्या नियामानुसारच झालेली आहे. अधिकृत दर उपलब्ध असल्याने ई-निविदा काढण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता शिवाय ही कंत्राटे मान्यताप्राप्त संस्थांनाच दिली गेली आहेत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे
पंकजा मुंडे यांच्या खात्यात २१० कोटीचा गैरप्रकार ?
Date:

