सातारा (जिमाका) : ‘न्याय आपले दारी’ Justice at the doorstep या महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेनुसार जिल्ह्यामध्ये दि. 10 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2015 अखेर मोबाईल लोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त खटले निकाली काढण्यासाठी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांनी केले.
जिल्हा व सत्र न्यायालयात मोबाईल लोकअदालत व्हॅनला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गव्हाणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखून व्हॅन मार्गस्त करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश 2 श्रीमती व्ही.एम.मोहिते, जिल्हा न्यायाधीश 3 ए.एन.पाटील, जिल्हा न्यायाधीश 5 व्ही.आर.कचरे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. अनिता नेवसे, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे, सरकारी वकील विकास पाटील, मोबाईल लोक अदालतीचे कामकाज पॅनेल प्रमुख निवृत्त न्यायाधीश डी. के. राजेपांढरे यांच्यासह अन्य न्यायाधीश व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोबाईल लोकअदालतीसाठी उच्च न्यायालयाकडून मोबाईल व्हॅनची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. या मोबाईल लोकअदालतीचे कामकाज पॅनेल प्रमुख निवृत्त न्यायाधीश डी. के. राजेपांढरे हे पाहणार आहेत. संपूर्ण लोकन्यायालयाचे कामकाज मोबाईल व्हॅनमध्ये चालणार आहे. गावपातळीवरील सर्व व्यक्तींकरिता आपली प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करता येतील. त्याचबरोबर सर्व बँका, मोबाईल कंपन्या, विद्युत वितरण कंपनी यांची वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करता येतील.
जिल्ह्यातील सर्व पक्षकार, विधिज्ञ आणि सर्व वित्तीय संस्था, मोबाईल कंपन्या यांनी या मोबाईल लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आणि न्याय आपले दारी ही संकल्पना यशस्वी करावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गव्हाणे यांनी केले.