मुंबई
-दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत मॅगी नापास झाली आहे. त्याचवेळी आज केरळ सरकानेही राज्यात मॅगीची विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ अन्य राज्येही मॅगीविरोधात उभी ठाकल्याने ‘नेस्ले’ची पुरती कोंडी झाली आहे.
सर्वात आधी उत्तर प्रदेशमध्ये मॅगी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कचाट्यात सापडली. मॅगी आरोग्यासाठी घातक असल्याचं तेथील तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर मॅगीचे उत्पादन करणारी नेस्ले कंपनी तसेच मॅगीची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा यांनाही दणका बसला. नेस्ले कंपनीपाठोपाठ आता या तीन स्टारवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुजफ्फरपूर न्यायालयाने दिले आहेत.
अशाप्रकारे चहुबाजूने मॅगीची कोंडी झाली असताना आज दिल्ली सरकाच्या तपासणीतही मॅगी नापास झाली आहे. सरकारने लॅबमधून मॅगीचे नमुने तपासून घेतले असता मॅगीतील घटक आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दिल्लीत एकीकडे मॅगीच्या अडचणी वाढल्या असताना केरळमध्ये तातडीने मॅगीची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातही अनेक स्वयंसेवी संस्थांनी मॅगीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.