माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे हे शनिवारी पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. सिंहगड रोडवर सायंकाळी सहा वाजता, तर कॅन्टोन्मेंटमध्ये सायंकाळी सात वाजता या सभा होणार आहेत.केंद्रात भाजपची सत्ता असली तरी सध्या वातावरण बदललेले आहे. मोदी लाट ओसरली असल्याने त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे. शहरातील मतदारांची मानसिकता बदलल्याने काँग्रेसला निश्चित फायदा होणार असल्याचा दावा पुणे शहर काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस आय पक्षाच्या उमेदवारांनी आज काँग्रेसभवनात संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवारांनी सर्वच विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती वेगळी असल्याने आणि मानसिकता बदलत असल्याने आमचा विजय निश्चित असल्याचे यावेळी नमूद केले. या पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाली असून, शहरात सगळ्या मतदारसंघांत परिस्थिती वेगळी असल्याने काँग्रेसचे उमेदवार हे सर्व ठिकाणी विजयी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नगरसेवक संजय बालगुडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात आला असून, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आले असल्याचे नमूद केले. तसेच, आगामी काळात प्रचाराची मदार आता पक्षाचे राज्य आणि देशपातळीवरील नेतेमंडळी सांभाळणार असून, प्रचारसभांचे आयोजन करण्यात येऊन काँग्रेस प्रचाराची राळ उडवून देणार असल्याचे बालगुडे यांनी नमूद केले.