मुंबई-वांद्रे पोटनिवडणुकीसाठी नारायण राणेंना पाठींबा देण्या ऐवजी तटस्थ रहाण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे . त्यामुळे स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पाठिंबा मिळवण्याचा काँग्रेस नेते नारायण राणेंचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्वाचा मुद्दा पुढे करून राणेंना पाठिंबा देण्यास नकार दिलाय.भाजपा नाही आणि मनसे नाही त्यामुळे आता थेट राणे विरुध्द शिवसेना अशी लढत होणार आहे ज्यामध्ये एमआयएम ने दिलेला उमेदवार आणि एमआयएम ची भूमिका निर्णयांक ठरण्याची चिन्हे आहेत . वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाचीच लढाई आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आमदार बाळा सावंत यांनी तिथे दोनदा भगवा फडकवला. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे आणि त्याच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. असं असतानाही, शिवसेनेला ‘जोर का झटका’ देऊन आपली ताकद दाखवण्याचा निर्धार कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणेंनी केला आहे. त्यामुळे हा सामना भलताच लक्ष्यवेधी आणि रंगतदारठरतो आहे. राणेंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवला आहे. त्यासाठी परवाच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती आणि उमेदवार न देण्याची विनंती केली होती. त्यानंतर, भाजपनंही वांद्र्यात उमेदवार न देण्याचं जाहीर केलं होतं. शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात काँटे की टक्कर होण्याची चिन्हं दिसत होती. परंतु, मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात एमआयएमनं सिराज खान यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या खालोखाल त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्यात. मुस्लिम मतं एमआयएमकडे जाण्याची दाट शक्यता असल्यानं राणेंसाठी एकेक मत मोलाचंहोईल असे बोलले जाते आहे. दरम्यान नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आमचे कौटुंबिक संबंध असल्याने मी राज ठाकरे यांची भेट घेतली. जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढणाऱ्या धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय व्हावा, यासाठी आम्ही राज ठाकरे यांचा पाठिंबा मागितला आहे. परंतु, राज यांनी राणेंना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आजारपण वा अपघातात विरोधी पक्षाच्या सदस्याचे निधन झाल्यास संबंधित ठिकाणी निवडणूक न लढविण्याचे आमचे धोरण आधीपासूनच ठरलेले आहे. त्यामुळे अशा वेळी कोणाला पाठिंबा देणे हे आमच्या धोरणांशी प्रतारणा केल्यासारखे होईल, असं राज यांनी स्पष्ट केलंय. मनसेचा हा पवित्रा राणेंसाठी किंवा शिवसेनेसाठी फायद्याचा ठरणार हे मतदानानंतर-निकालानंतरच स्पष्ट होणार आहे