झी मराठीवर ९ मार्चपासून सोम. ते शनि. रात्री १०.३० वा.
मैत्री म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं तसं अवघडच. मैत्रीचं नातं हे सर्व बंधनापलिकडचं असतं. त्याला वयाचं, अंतरांचं, जाती-धर्माचं, वर्णाचं, लिंगाचं असं कुठलंच बंधन नसतं. शाळेत, वर्गात, कॉलेजमध्ये, कट्यावर, कार्यालयात, कधी कधी तर प्रवासातही मैत्रीचे धागे जुळतात आणि घट्ट होतात. पण ही मैत्री ख-या अर्थाने तेव्हा अधिक बहरते जेव्हा आपण आपल्या घरापासून दूर असतो . शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर असणा-यांचं ‘होस्टेल लाइफ’ किंवा ‘पीजी लाइफ’ असं एक वेगळं विश्व तयार झालेलं असतं ज्यात सर्वार्थाने केंद्रस्थानी असते ती मैत्री. अशाच एका मैत्रीची आणि मित्रांची गोष्ट सांगणारा ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हा युथफुल कार्यक्रम झी मराठीवर दाखल होतोय येत्या ९ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता. ‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक आणि प्रसिद्ध छायादिग्दर्शक संजय जाधव यांच्या ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेव्हन या संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
दिल दोस्ती दुनियादारीची कथा आहे घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुंबईत आलेला आहे. यात कुणाचा करिअरचा स्ट्रगल आहे तर कुणाचा काही तरी फॅमिली प्रॉब्लेम आणि हा स्ट्रगलच या सर्वांमधील एक समान धागा आहे. घरापासून आणि कुटुंबापासून दूर आलेल्या या सहा जणांचं एक नवं कुटुंब तयार झालं आहे ज्यात मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि सोबतच धम्माल, मजा मस्तीही आहे. यातील प्रत्येकाने उराशी जोपासलंय एक स्वप्न. विविध स्तरातून आणि पार्श्वभूमीतून आलेला हा प्रत्येकजण आपापली स्वप्नं साकार करण्यासाठी या शहरात आलाय जिथे पावलापावलावर आहेत नवे अडथळे, नवी आव्हाने आणि नवे संघर्ष. या संघर्षांना एकमेकांच्या साथीने तोंड देत सगळे निघालेयत अंतिम ध्येयाच्या दिशेने. काय आहेत त्यांची स्वप्नं ? आणि काय आहेत त्यांची आव्हाने? याची गोष्ट बघायला मिळणार आहे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मध्ये.
मराठी मालिकांच्या विश्वात कायम काही तरी नवीन आणि दर्जेदार कथा देणा-या झी मराठी वाहिनीवरून ही ‘फ्रेश’ विषयावरची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विषयासोबतच यात नाविन्य आहे ते यातील कलाकारांचं. यातील सहाही व्यक्तिरेखांसाठी अतिशय फ्रेश चेह-यांची निवड करण्यात आली आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर अशी नव्या दमाची कलाकार मंडळी या मालिकेत बघायला मिळणार आहे. मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन आणि छायांकन करणारे संजय जाधव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. तर ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेचे दिग्दर्शन करणारे विनोद लव्हेकर यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. संजय जाधव आणि आशिष पाथरे यांची कथा आहे तर आशिषच्या सोबतीने मनस्विनी लता रविंद्र यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.
आजच्या तरूणाईची गोष्ट त्यांच्याच भाषेत मांडणारी ही मालिका युथफुल असली तरी ती सर्व प्रेक्षकांचा विचार करून बनवली आहे त्यामुळे ती सर्वांनाच आवडेल अशी झालीये. नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट ‘दिल दोस्ती दुनियादारी’ दाखल होतेय येत्या ९ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर.