पुणे: नवीन निवासी, व्यापारी संकुलाच्या किंवा उद्यानांसारख्या सार्वनजिक जागेत महावितरणच्या
वीजयंत्रणेसाठी आवश्यक असणारी जागा आरक्षित करावी, असे निर्देश पालकमंत्री गिरीश बापट यांनी
विधानभवन येथे पुणे जिल्हा विद्युत समितीची बैठक झाली. जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार श्री.
शिवाजीराव आढळराव पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर पालकमंत्री गिरीश बापट,
जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव, आमदार श्री. विजय काळे, आमदार श्री. भीमराव तापकिर, आमदार श्री. जगदीश
मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, आमदार श्री. गौतम चाबुकस्वार, आमदार श्री.
राहुल कुल, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे (पुणे परिमंडल) व श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती
परिमंडल), महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, की बांधकामे किंवा सार्वजनिक उद्याने तयार झाल्यानंतर वीजयंत्रणेसाठी
जागा दिली जाते. त्यांनतर उभारलेली वीजयंत्रणा सुरक्षित व योग्य जागेत नसल्याने धोका निर्माण होतो. त्यामुळे
नवीन बांधकामाच्या ठिकाणी वीजयंत्रणेसाठी जागा आरक्षीत करावी. तसेच शहरातील अनधिकृत वस्त्यांना
महावितरणने अधिकृत वीजजोड देण्याबाबत धोरण स्पष्ट करावे आणि महापालिकेने वीजजोडणी देण्यास हरकत
घेतली असल्यास समन्वयातून तोडगा काढण्यात यावा असे श्री. बापट यांनी सांगितले.
या बैठकीत मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी सादरीकरणातून महावितरणच्या विविध योजनांची
तपशिलवार माहिती दिली. यात पुणे जिल्ह्यासाठी एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम (Integrated
Power Development Scheme) भाग एकमध्ये 233 कोटी 66 लाख व भाग दोनमध्ये
49 कोटी 16 लाख तसेच दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना भाग एकमध्ये 99 कोटी 65 लाख व भाग
दोनमध्ये 156 कोटी 94 लाख रुपये प्रस्तावित आहेत. एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) व
दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या पहिल्या भागातील कामे व निधी मंजूर झाल्याची माहिती मुख्य
अभियंता श्री. मुंडे यांनी दिली. पुणे शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महावितरणकडून तयार करण्यात
आलेल्या सुमारे 200 कोटींच्या प्रस्तावित आराखड्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत तसेच वीजग्राहकांच्या तक्रारी
निवारणाबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार श्री. शिवाजीराव
आढळराव पाटील यांनी दिले. बैठकीचे सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायदूर्ग यांनी केले.
महावितरण व महापारेषणचे जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.