पुणे,: शासनाने लॉटरी ड्रॉ पद्धतीने दि. 26 फेब्रुवारी 2014 रोजी नवीन रिक्षा परवाने वितरणासाठी यशस्वी यादी व प्रतीक्षा यादीद्वारे विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक 1 ते 140 वर नमूद अर्जदारांनी 20 जून पर्यंत अर्ज दाखल केले नसल्यास सर्व कागदपत्रासह दि. 30 जून 2015 पर्यंत दाखल करावेत. दिनांक 5 जुलै 2015 पासून अर्जदारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या दाखल्यांची, कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांना मुलाखतीसाठी तारीख देण्यात येईल.
यशस्वी उमेदवारांना रिक्षा परवाने वाटपाचे काम पूर्ण झाले असून, त्यामधील 140 उमेदवार कार्यालयात हजर झाले नाहीत किंवा अपात्र ठरले आहेत. या परवान्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील प्रथम उमेदवारांना ऑटोरिक्षा परवाने जारी करण्याबाबत पुढील कार्यपद्धती सुरु करण्यात येत आहे.
सर्व अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, सर्व निकष पूर्ण करणाऱ्या अर्जदारांना इरादापत्रे (एन.ओ.आय.) जारी करण्यात येतील. खोटे दाखले अथवा शपथपत्र सादर करणारे अर्जदार फौजदारी कारवाई पात्र ठरतील. रिक्षा वितरकांनी रिक्षाच्या किंमतीचे फलक त्यांच्या शोरूममध्ये ठळकपणे प्रदर्शित करावेत व त्यापेक्षा जास्त किंमत आकारू नये अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.