(‘द इकॉनॉमिस्ट’ ने प्रसिध्द केलेले छायाचित्र )
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी म्हणजे भारताचा ‘वन मॅन बँड’ आहे असे सांगत
‘द इकॉनॉमिस्ट’ या ब्रिटनमधील प्रसिद्ध नियतकालिकानं मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडला आहे. भारताचं भविष्य उज्ज्वल आहे, पंतप्रधान मोदींची दिशाही योग्य आहे, पण त्यांचा वेग अगदीच मंद आहे आणि अजूनही त्यांचा दृष्टिकोन गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखाच वाटतो, अशी समीक्षा ‘द इकॉनॉमिस्ट’ ने केली आहे . मोदींचा उल्लेख ‘वन मॅन बँड’ असा करून, देशात बदल घडवण्यासाठी त्यांना नवी ‘धून’ वाजवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारनं एका वर्षात ‘काय कमावलं, काय गमावलं’, यावर सगळ्याच स्तरांत दणक्यात चर्चा सुरू आहे. मोदींचे निर्णय कसे चुकले, याचा पाढा त्यांचे विरोधक वाचत आहेत; तर त्यांचे कट्टर समर्थक हे सगळे दावे खोडून काढत मोदींच्या कामगिरीवर स्तुतिसुमनं उधळत आहेत. देशात ही शाब्दिक चकमक सुरू असताना, परदेशातील मॅगझिनही मोदी सरकारच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. अमेरिकेतील ‘टाइम’ मॅगझिननंतर ब्रिटनच्या ‘द इकॉनॉमिस्ट’नं आपल्या ‘कव्हर स्टोरी’मधून मोदींच्या यशापयशाचं सर्वंकष मूल्यमापन केलंय. त्यात त्यांनी काही बाबतीत मोदींची पाठ थोपटली आहे
‘द इकॉनॉमिस्ट‘ ने प्रसिध्द केलेले ठळक मुद्देः
* कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना आवर घालण्यास मोदी अपयशी ठरलेत, पण अजून कुठलाही धार्मिक हिंसाचार उसळला नाही, ही समाधानाची बाब आहे.
* देशात ‘अच्छे दिन’ आणण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकार खूप संथपणे काम करतंय.
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःकडे जेवढे अधिकार ठेवलेत, तेवढे बहुधा कुठल्याच पंतप्रधानाकडे नव्हते.
* भारतात मोठ्या बदलांची गरज आहे आणि तेच ‘वन मॅन बँड’पुढील खडतर आव्हान आहे. हे ध्येय गाठण्यासाठी त्यांना राष्ट्रीय नेत्याचा दृष्टिकोन ठेवावा लागेल. मोदी अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखाच विचार करताना दिसतात.
* मोदी योग्य दिशेनं वाटचाल करताहेत आणि भारताचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. भारत लवकरच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल, पण सोबतच काही वर्षांत भारत, जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल.
* विकासाच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या भारताचं नेतृत्व एकच व्यक्ती करू शकते असं मोदींना वाटतं आणि ती म्हणजे, नरेंद्र दामोदरदास मोदी.
* इंधनाचे दर, व्याजदर आणि कमी होणारी महागाई ही अर्थव्यवस्था सुधारत असल्याची लक्षणं आहेत. ७.५ टक्के दराने जीडीपी वाढल्यास भारत चीनलाही मागे टाकेल. ही जगातील सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल.
* आपल्याकडे अजून बराच वेळ आहे, असा विचार मोदींनी करू नये. तसंच, ‘आधी सत्ता सांभाळू, सुधारणा होत राहील, असा इतर राजकारण्यांसारखा विचारही घातक ठरू शकतो.
* सरकारी काम सोपं आणि प्रभावी करण्यासाठी मोदींनी खासगी क्षेत्रातील लोक आणायला हवेत. तसंच, रेल्वेची बिकट स्थितीही खासगी कंपन्या वेगानं सुधारू शकतात.