पुणे :
पुण्यातील नद्यांचे संरक्षण व्हावे यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात यावी, याचाच एक भाग म्हणून नदी पात्रात सुरक्षा रक्षक (डशर्लीीळीूं र्ॠीरीव) नेमावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी केली होती. या मागणीनुसार पुण्यातील नदी पात्र व तेथील परिसर स्वच्छ राहवा यासाठी 15 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सुरक्षा रक्षकांना नदी पात्रातील स्वच्छता यासाठी सुरक्षा रक्षकांनी कशा प्रकारे कार्यरत रहावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुणे महानगरपालिका येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला महापालिका सहाय्यक आयुक्त माधव देशपांडे, माधव जगताप, संध्या घागरे, वसंत पाटील, जयंत भोसेकर, उपआयुक्त सतीश कुलकर्णी, दिलीप शेडगे (पूर्णवेळ नियंत्रक) आणि नदी पात्रात कार्यरत 15 सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
पुण्यातील नदी पात्र व तेथील परिसर स्वच्छ राहवा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण विविध प्रकारे प्रयत्न करीत आहेत. नदी पात्रात व परिसरात राजरोसपणे टाकण्यात येणारा राडारोडा, कचरा, निर्माल्य तसेच बेकायदेशीरपणे होत असलेली वाहनतळे, स्थलांतरीत लोकांची अतिक्रमणे इ. पासून नदीपात्र धोक्यात येत आहे. याविषयी खा.वंदना चव्हाण यांनी सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन केले.
आपली भूमिका मांडताना खा.वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘पुणे महानगरपालिकेमार्फत नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक आपली जबाबदारी पार पाडतील पण आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे तसेच पुणेकर म्हणून आपणच आपली नदी स्वच्छ ठेवायला हवी. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी एकात्मिक प्रयत्न केले पाहिजेत.’
या आधी खासदार वंदना चव्हाण यांनी नदीपात्रात फेरीवाल्यांना जागा देण्यास विरोध करण्यात आला होता. यापुर्वीच ‘नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल’च्या वतीने नदीपात्रात बांधकामास बंदी केली आहे.

