तिरुवनंतपुरम – ‘महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसेने महात्मा गांधींऐवजी पंडित नेहरूंना मारायला हवे होते,’ असे खळबळजनक मत भाजपचे नेते गोपालकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘केसरी’ या मुखपत्रातील लेखात मांडले आहे.
आतापर्यंत महात्मा गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे म्हणणाऱ्यानी आता …. ; पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वार्थी राजकारणामुळेच देशाची फाळणी झाली. त्यांना महात्मा गांधींविषयी काडीचेही ममत्व नव्हते’ असे म्हटल्याने लोक अचंबित होत आहेत ‘केसरी’च्या १७ ऑक्टोबरच्या अंकात हा लेख प्रकाशित झाला आहे. गोपालकृष्णन यांनी केरळच्या चालाकुडीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी लिहिले आहे की, ‘सर्व मोठ्या राष्ट्रीय आपत्तींचे कारण नेहरूंचा स्वार्थ हेच होते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी फाळणी आधीची ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि गोडसेच्या विचारांचा अभ्यास केला असता तर गोडसेने चुकीच्या व्यक्तीला मारले, या निष्कर्षावर ते पोहोचले असते.’
काँग्रेसने या लेखाबद्दल संघावर कडाडून टीका केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी केली.
लेखात म्हटले आहे की, गांधीहत्येत संघाचा हात नव्हता. गोडसे नेहरूंपेक्षा चांगला होता. त्याने सन्मानपूर्वक झुकल्यानंतर गांधीजींना गोळी मारली. समोर झुकायचे आणि पाठीत सुरा खुपसायचा असे नेहरूंसारखे त्याने केले नाही.’गोपालकृष्णन यांच्या लेखावर चौफेर टीका होत असताना त्याचे समर्थन ‘केसरी’चे संपादक एन. आर. मधु यांनी केले आहे. ‘नेहरूंचे राजकारण, त्यांची धोरणे यावर आम्ही सातत्याने टीका करीत आलो आहोत. आणि या लेखात नेहरू यांना शारीरिकदृष्ट्या टार्गेट करा, असे कुठे म्हटले आहे?’, असा उलटाच प्रश्न मधु यांनी केला! या प्रकरणी आवश्यक असल्यास कारवाई करण्याचे आदेश केरळच्या गृहमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.