पुणे: धानोरे (ता. खेड) येथील लक्ष्मी ब्राईट स्टील या कारखान्यात 14,713 युनिटची म्हणजे 2 लाख 7 हजार 280 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत धानोरे (ता. खेड) येथील मेसर्स लक्ष्मी ब्राईट स्टील या कारखान्याला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आलेली आहे. या कारखान्याची ही जागा भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. या कारखान्यातील वीजवापरातील अनियमिततेवरून संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. यात कारखान्यातील सीटी ऑपरेटेड वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले व 14,713 युनिटची म्हणजे 2 लाख 7 हजार 280 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
मेसर्स लक्ष्मी ब्राईट स्टील कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे, सुरेश वानखेडे, उपकार्यकारी अभियंता श्री. रामचंद्ग चव्हाण, सहाय्यक अभियंता जया केवलिया, कनिष्ठ अभियंता श्रीकांत हुमनाबादकर, तंत्रज्ञ विशाल सावैतुल, अशोक तांदळे आदींनी योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मेसर्स लक्ष्मी ब्राईट स्टील कारखान्याच्या मालक अनुपमा संजय दरक विरुद्ध मंगळवारी (दि. 15) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.