दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित करून या सरकारने खरा चेहरा दाखविण्यास सुरवात केली आहे. संघप्रमुखांचा कार्यक्रम ज्या दिवशी नागपुरात झाला. त्याच दिवशी नागपूरमध्ये धम्मप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो आंबेडकरी जनता एकत्र आली होती. संघप्रमुखांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या केंद्र सरकारला धम्मप्रवर्तन दिनाचे प्रक्षेपण करता आले नाही, यावरून हे सरकार कोणत्या दिशेने आणि विचाराने पुढे जाणार हे वेगळे सांगायला नको. या परिस्थितीत आता अधिक जागृत राहण्याची गरज आहे. समतेच्या विचाराला बांधील राहून महिला व दलितांना शक्ती देणारा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस बांधील आहे.‘‘ असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले
पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ आज पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी पवार बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी व भाजपच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. शेतमालाच्या निर्यातीला बंदी घालून या सरकारने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. याच कारणाने उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत तेथील ग्रामीण जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली.
‘भाजपच्या विजयात उत्तर प्रदेशचा वाटा मोठा होता. मात्र, लगेचच झालेल्या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील नऊपैकी आठ ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. एक राजकीय अभ्यासक म्हणून उत्तर प्रदेशचा दौरा केला. या दौऱ्यात तेथील शेतकऱ्यांत या सरकारच्या विरोधातील चीड दिसली. शेतमाल निर्यातीला बंदी घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यातून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले.‘‘
शिवसेनेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेसारखी स्वाभिमानी संघटना उभी केली. त्यामुळे शिवसेना भाजपपासून वेगळे झाल्याचे समाधान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही भाजपवर कधीही विश्वास नव्हता. “कमळाबाई‘ या नावानेच ते भाजपचा नेहमी उल्लेख करीत होते. युती एका बरोबर नजर दुसऱ्या पक्षावर अशी भाजपची कायमची नीती आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर या पक्षाकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र अल्पावधीतच त्यास ओहोटी लागली आहे.‘‘ कोणताही पक्ष मोठा होण्यासाठी वेळोवेळी पक्षात नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. 47 वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी माझ्यासारख्या नवख्या तरुणाला संधी दिली. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, असे पवार यांनी सांगितले.
संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित; धम्मप्रवर्तनाचे प्रक्षेपण का नाही-शरद पवार
Date: