पुणे, दि. 29 : रविवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरातील दोन व्यापारी व एका घरगुती वीजग्राहकाकडे सुरु असलेली 1 लाख 62 हजार 650 रुपयांची वीजचोरी महावितरणच्या मीटर तपासणीच्या मोहिमेत उघडकीस आली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की रास्तापेठ विभाग अंतर्गत कॅम्पमधील वेल्सली रोडवरील व्यावसायिक भारत ईश्वरलाल भुतडा यांच्या इंडियन अरोमा हॉटेलमध्ये थेट वीजयंत्रणेतील बसबारमधून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. यापूर्वी थकबाकीमुळे या हॉटेलमधील वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला होता. या हॉटेलमध्ये 5040 युनिटचे म्हणजे 90 हजार 820 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. याशिवाय रविवार पेठमधील ई. एच. रंगवाला यांच्या नावे असलेली वाणिज्यिक वीजजोडणीचे हिरेन शहा हे वापरकर्ते आहे. या वीजजोडणीच्या तपासणीत मीटरमधील रिंडींग नोंद होण्यासाठी वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार केल्याचे आढळून आले. यात 2070 युनिट म्हणजे 34 हजार 510 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. तसेच शुक्रवार पेठ येथील अलकिस्मत नावाच्या इमारतीत राहणारे फकरूद्दिन कमरुद्दिन बॅरिस्टर यांच्या फ्लॅटमध्ये थेट वीजयंत्रणेतील बसबारमधून अनधिकृत वीजपुरवठा सुरु असल्याचे आढळून आले. यात 3820 युनिटची म्हणजे 37,320 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. गणेश एकडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. बी. जी. शेंडगे, सहाय्यक अभियंता सर्वश्री रणजित वाघ, सुरेंद्ग बोंगाळे, विनायक शिंदे, जनमित्र एस. के. महाजन, बी. व्ही. जगताप, बी. टी. थिटे, सिद्धार्थ गायकवाड, सतीश तिवसकर आदींनी ही वीजचोरी उघडकीस आणली.
या तिनही वेगवेगळ्या वीजचोरीप्रकरणी भारत ईश्वरलाल भुतडा, हिरेन शहा व फकरूद्दिन कमरुद्दिन बॅरिस्टर यांच्याविरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.