बालदिनाची बच्चेकंपनीला मनोरंजनाची खास भेट
दुरचित्रवाणी, यु ट्युब आणि सोशल नेटवर्क साइट्सवरून झळकणारे ट्रेलर, व्हाट्स अॅप फेसबुक सारख्या माध्यमांतून शेअर होणारे पोस्टर्स यामुळे सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट उद्या बालदिनी सुमारे २०० थिएटर्समधून प्रदर्शित होणार असून दिवसाला साडेचारशेहून अधिक शोज् होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि गुजरातमधील काही शहरांतही तो झळकणार आहे. परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मयसभा आणि एस्सेल व्हिजनने केली आहे.
नावातूनच उत्सकुता निर्माण करणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला आहे. कोणताही प्रसिद्ध कलाकार किंवा नायक, नायिका या चित्रपटामध्ये नसले तरी यातील लहानगे कलाकार हेच या चित्रपटाचे ‘स्टार’ आहेत. पंढरपुरच्या मातीतील सायली भंडारकवठेकर आणि पुष्कर लोणारकर तर पुण्याचा निरागस छोकरा असलेला श्रीरंग महाजन हे तिघेही सध्या प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाले आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारं ज्ञानेश म्हणजेच श्रीरंगचं प्रवचन, झेंडु म्हणजेच सायलीचं “गरम बांगड्या घ्या गरम बांगड्या” हा डायलॉग आणि गण्या म्हणजेच पुष्करच्या स्पेशल शिव्यामुळे सध्या हा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.. याशिवाय या तिघांवर चित्रीत केलेलं “दगड दगड” हे गाणंही सर्वांना आवडत आहे. पंढरपुरची पार्श्वभूमी आणि कार्तिकी एकादशीच्या उत्सवात घडणारी एक धम्माल गोष्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’नंतर परेश मोकाशी यांनी ही दुसरी कलाकृती प्रेक्षकांसाठी आणली आहे. चित्रपटाची कथा मधुगंधा कुलकर्णी यांची असून अमोल गोळे यांचे छायांकन आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’, ‘लय भारी’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनने खास बालदिनाच्या दिवशी ‘एलिझाबेथ एकादशीची’ भेट प्रेक्षकांसाठी आणली आहे. बच्चेकंपनीसोबतच मोठ्यांनाही आवडेल असाच हा चित्रपट १४ नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.