सध्या प्रसारमाध्यमांच्या विशेषत: टीव्ही वाहिन्या , इंटरनेट यांच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या मुले अकालीच प्रौढ होत आहेत.या कळत्या – नकळत्या वयाच्या सीमा रेषेवर त्यांच्या भोवतीची आकर्षणही वाढता आहेत
पौंगडावस्थेतील मुलांना अनेक मानसिक व शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते आणि त्या सगळ्या गोष्टीत ते त्यांचे बालपण हरवून बसतात,नवनवीन गोष्टीत गुंतण्याच्या ह्या वयात चांगल्या वाईटाचे भान सुटून जाते आणि आयुष्य घडवण्याच्या ऐन उमेदीच्या काळात ते मानसिकरित्या खचतात आणि ह्या सगळ्यातून त्यांना अलगद बाहेर काढणे हे खूप महत्वाचे असते.गाठ सोडवताना गुंता अधिक वाढणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते आणि नेमके ह्या परिस्थितीत पालक म्हणून आपली काय जबाबदारी आहे किंवा आपण काय भूमिका घेतली पाहिजे हे स्पष्टपणे मांडणारा ‘शिवम क्रिएशन’चा युवराज पवार निर्मित राजेंद्र पवार दिग्दर्शित कट्टी-बट्टी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
‘शाळा’ चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळालेल्या ‘सु-या’ म्हणजेच केतन पवारची दे धम्माल भूमिका हे या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य.त्याच्यासोबत प्रीतम भुजबळराव, प्राजक्ता यादव ही सध्या युवा रंगभूमीवर नावजलेली नवी जोडी आहे. तसेच त्यांच्यासोबत अरुण नलावडे,डॉ.विलास उजवणे,संजीवनी जाधव, जयराज नायर, दीपज्योती,प्रभाकर मोरे, महेंद्र अभंग, दिपाली कुलकर्णी असा अनुभवी कलाकारांचा संच आहे.
सुजित महतो यांचे छायांकन लाभलेल्या ‘कट्टी-बट्टी’ची गुरु ठाकूर यांनी लिहलेली सुरेल प्रसन्न गीते युवा संगीतकार प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केली असून स्वप्नील बांदोडकर,केतकी माटेगावकर,प्रवीण कुंवर,योगिता चितळे, अभिजित सावंत. गंधार आणि वैशाली सामंत यांच्या सुरेल स्वरात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसातच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित होईल.
प्रत्येक मुलाला आणि पालकांना आपला वाटेल असा हा नर्मविनोदी चित्रपट लोकप्रिय ठरले असा दृढ विश्वास या चित्रपटाच्या टीमला आहे.