पुणे:
दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी पी.ए. इनामदार आणि उपाध्यक्षपदी कु. मुमताझ सय्यद यांची नियुक्ती झाली आहे. गुरूवारी झालेल्या नवनियुक्त संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे शहर) विनायक कोकरे यांनी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. ही नियुक्ती 2015-2020 या काळासाठी आहे. मावळते अध्यक्ष शफी दिल्लीवाले यांच्याकडून पी.ए.इनामदार यांनी सूत्रे स्वीकारली. या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली होती.
मुस्लिम सहकारी बँकेच्या 27 शाखा असून पुण्यात मुख्य कार्यालय आहे. 1931 साली स्थापन झालेल्या या बँकेच्या 500 कोटी ठेवी आहेत.
‘आर्थिक भक्कम पायावर ही बँक उभी आहे. नावात मुस्लिम असले तरी सर्व समाजातील लोकांच्या ठेवी आणि कर्जांचा समावेश बँकेत आहे. भारतात बँकिंग क्षेत्रात विशेषत: सहकारी स्थित्यंतरे होत असतानाच्या बदलांची जाणीव असणारी आणि तसे बदल घडविणारी ही बँक आहे. बँकेला आणखी प्रगती प्रथावर नेण्यासाठी प्रयत्न करू’, असे यावेळी नवनियुक्त अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी सांगितले. यावेळी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा कर्मचारी वर्गाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

