घटस्थापनेच्या मुहूर्तावर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील गुरुवारी (दि. २५) घोडेगाव येथे दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी मंचर येथील बाजार समितीच्या आवारात सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. नेत्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावोगाव मोढा (काम बंद) पाळून ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे जाहीर सभेसाठी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत.
उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता अवसरी खुर्द येथे भैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यानंतर मंचर बाजार समितीच्या आवारात त्यांची जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेला जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यादृष्टीने मोठय़ा संख्येने ग्रामस्थ सभेत आपल्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात मात्र पाण्याचा सुकाळ अनुभवलेले शेतकरी नेत्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहणार आहेतअसे कार्यकर्ते सांगत आहेत सभा संपल्यानंतर घोडेगाव येथे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ढोल, लेजीम, ताशे इत्यादी पारंपरिक वाद्यांच्या साक्षीने वाजत गाजत ते जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय आंबेगाव-शिरूर मतदारसंघात असणे शक्यच नाही, असा कार्यकर्त्यांचा दावा आहे