“सिनर्जी’ व “गंगोत्री’ या संस्थांचा चारुहास पंडित यांच्याबरोबरचा “चिंटू गँग’ दिनदर्शिका उपक्रम
पुणे :
गेली 24 वर्षे मराठी मनांवर अधिराज्य गाजविणारा “चिंटू’ आता “चिंटू गँग’ या मुलांसाठीच्या दिनदर्शिकेतून आपल्याला वर्षभर भेटणार आहे. या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ शि. द. फडणीस (ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार), विनोद तावडे (उच्च शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंत्री), एअर मार्शल भूषण गोखले (अध्यक्ष – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी) व श्रीरंग गोडबोले (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक) यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सामाजिक भान जपणाऱ्या “सिनर्जी प्रॉपर्टीज’ व “गंगोत्री ग्रीनबिल्ड’ या संस्थांची निर्मिती असणाऱ्या “चिंटू गँग’ दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ रविवार, 28 जून 2015 रोजी सायंकाळी सहा वाजता काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट प्रांगण, बीएमसीसी रस्ता, डेक्कन जिमखाना पुणे येथे होणार आहे. या दिनदर्शिकेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. अशी माहिती चारुहास पंडित, मकरंद केळकर, मंदार देवगावकर, गणेश जाधव, राजेंद्र आवटे व महेश पोहनेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जुलै 2015 ते जून 2016 या शैक्षणिक वर्षाची ही दिनदर्शिका रंजकतेने मूल्यशिक्षण देणारी दिनदर्शिका आहे. यामध्ये “पर्यावरण’, “पाणी’, “ध्वनी प्रदूषण’, “वाहतूक’, “कचरा समस्या’ या विषयांवर संवाद साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजविणाऱ्या “चिंटू’ या व्यक्तिचित्राद्वारे मूल्याधारित शिक्षण पोहोचविण्याचे काम होणार आहे. “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’, “शिक्षणविवेक’ व “रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ’ च्या मदतीने ही दिनदर्शिका 18,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे. ही दिनदर्शिका 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे.
प्रकाशन समारंभप्रसंगी रोहन भडसावळे व ओजस नातू यांची तबला जुगलबंदी व स्वरुप-वर्धिनी संस्थेचे विद्यार्थी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना ही दिनदर्शिका मोफत देण्यात येणार आहे.