दिंडीमध्ये ‘डायल 108’ च्या रूग्णवाहिकेच्या वतीने 25 जणांना आप्तकालीन मदत तसेच 850 जणांची आरोग्य तपासणी
पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’च्या एकूण 30 रुग्णवाहिका वारकर्यांच्या सेवेत तैनात करण्यात आल्या आहेत. या दिंडीमध्ये आतापर्यंतच्या तपशीलानुसार 25 रूग्णांना आप्तकालीन मदत देऊन रूग्णालयात हलविण्यात आले आहे.तर 850 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यातील 2 रूग्णवाहिका ज्ञानेश्वर महाराज पालखी बरोबर तसेच 2 रूग्णवाहिका तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर जात आहेत, उर्वरीत 26 रूग्णवाहिका पालखी मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
‘गोल्डन अवर्स’ मध्ये तातडीचे उपचार देणार्या ‘डायल 108’ च्या रुग्णवाहिका सुरूवातीपासून शेवटपर्यंत सतत पालखीबरोबर राहणार आहेत. पालखीबरोबर वारकर्यांना आरोग्य सुविधा तसेच पालखी मार्गावर तातडीचे वैद्यकिय उपचार देण्यासाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
मागील वर्षी ‘डायल 108’ या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या 56 रुग्णवाहिकांनी तब्बल 29,972 वारकर्यांची सेवा केली. वारी मार्ग आणि पंढरपूर येथे 56 अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेल्या रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. दरवर्षी साधारण 25 ते 30 वारकर्यांचा मृत्यू विविध कारणांनी वारीदरम्यान होतो. मागील वर्षी हे प्रमाण डायल 108 रूग्णवाहिका सेवेमुळे सहापर्यंत खाली आणण्यात यश आले होते.
पालखी मार्गावर कोणतीही आपत्कालिन वैद्यकीय मदत लागली तर सुसज्ज रुग्णवाहिका 108 क्रमांक डायल केल्यावर उपलब्ध असतील. त्यात व्हेंटीलेटर (कृत्रिम श्वसन) अशी आधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपत्कालीन उपचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहाय्यकही या रुग्णवाहिकेत असणार आहेत. पुणे ते पंढरपूर मार्गावर ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल त्याठिकाणी काही अॅम्ब्युलन्स सेवेत राहणार आहेत. ही सेवा विनामूल्य असणार आहे, मात्र रुग्णालयातून घरी सोडणे, अथवा खासगी रुग्णालयात दाखल होणे यासाठी ही रुग्णवाहिका सेवा देता येत नाही. रूग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्यास नजीकच्या सरकारी रूग्णालयात या डायल 108 रूग्णवाहिकांच्या मार्फत दाखल करण्यात येते.
26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. ‘अपघात’, ‘जळीत’, ‘विषबाधा’, ‘हदयविकार’, ‘अर्धांगवायू’ अशा कोणत्याही आपत्कालिन गोष्टीत दूरध्वनी केल्यास ही रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते.