मुंबई : दहिसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या 150 कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवालातील सर्व प्रस्तावित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
दहिसर नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण, दहिसर नदीच्या परिसरात खारफुटी उद्यान (मॅंग्रुव्हज् पार्क) विकसित करणे आणि गणपत पाटील नगरात मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आदी दहिसर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीस आमदार मनीषा चौधरी, महापालिका आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितिन करीर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शर्मा आदीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, दहिसर नदीचा 4.5 कि.मी. लांबीचा परिसर सुशोभित करण्यासाठी नदी पात्राच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, नदीवर चार पादचारी उड्डाणपूल बांधणे आदी कामांबरोबरच वने आणि पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी नदी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. तसेच या परिसरातील खारफुटीच्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी वने, पर्यावरण आणि पर्यटन विभागाच्या मदतीने मॅंग्रुव्हज् पार्क उभारण्यासाठी आवश्यक ती योजना तयार करण्यात यावी. त्याचबरोबर दहिसर परिसरातील गणपत पाटील नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाने समिती नेमून तिचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.