पुणे-‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’ तर्फे पुण्यात राहणाऱ्या मुळशी तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सभारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार सुतार आणि ‘युनिक अकादमी’ चे प्रमुख व्यवस्थापक नागेश गव्हाणे हे उपस्थित होते.
व्यासपीठावर ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नंदकुमार सुतार आणि नागेश गव्हाणे यांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोश आणि स्मृतीचिन्ह देवून त्यांच्या पाठीवर ‘शाबास’कीची थाप देण्यात आली. आपल्या पाल्यांचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
‘युनिक अकादमी’ चे प्रमुख व्यवस्थापक नागेश गव्हाणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील आव्हानाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून अभ्यास केल्यास लोकसेवा आयोगातील मराठी मुलांची कमी असलेली टक्केवारी वेगाने वाढू शकते असे आवाहन त्यांनी केले. तर नंदकुमार सुतार यांनी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच मन लावून अभ्यास केल्यास ते आपले ध्येय नक्कीच गाठू शकतील असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी आपल्या प्रास्ताविकात, संस्थेतर्फे दरवर्षी केल्या जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती सांगितली. पुणे शहराची आता ‘स्मार्ट सिटी’त गणना होणार असल्याने विद्यार्थ्यांनी रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देवून स्वत:च्या विकासाबरोबरच मुळशी तालुक्याचाही विकास करून मुळशी तालुक्याला विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’ चे निवृत्ती येवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर लक्ष्मण कंधारे यांनी आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उभे आणि सीताराम चोंडे पाटील यांनी केले.