पुणे – सिंहगड रस्त्यावरील डॉमिनोज पिझ्झासह सनसिटी आणि नऱ्हे परिसरातील पाच सोसायट्यांमधील वाहने पेटवून देण्याचा प्रकार हा कुणा माथेफिरूचे काम नसून, हा पूर्वनियोजित कट असल्याचे पोलीस आयुकत के. के. पाठक यांनी सांगितले.सोसायट्यांमध्ये वाहने पेटवून देणाऱ्या व्यक्तीची माहिती कुणाकडे असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संपर्कासाठी (पोलीस निरीक्षक बळवंत काशिद 9823066605, सहाय्यक पोलीस आयुक्त, 9764500100)हे क्रमांक हि त्यांनी दिले आहेत हा प्रकार नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी केलेला असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, तपास युद्धपातळीवर सुरू आहे, असे पाठक यांनी सांगितले.
रविवारी (दि. 28) पहाटे सिंहगड रस्त्यावरील डॉमिनोज पिझ्झासमोरील 29 दुचाक्यांसह सनसिटी आणि नऱ्हे परिसरातील पाच सोसायटीतील तब्बल 92 वाहने पेटवून देण्यात आली. यामध्ये सर्वसामान्यांचे अंदाजे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेला तीन दिवस झाले तरी पुणे पोलिसांना मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास अद्याप यश आले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सर्व शक्यता तपासून वेगवेगळी पथके युद्धपातळीवा तपास करीत आहेत. रविवारी घटना घडल्यानंतर संशयित म्हणून परिसरातील गुन्हेगार बंटी पवारला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सिंहगड रस्ता परिसरात झालेल्या खुनातील आरोपी विनोद जमदारे याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. वाहने पेटवून दिलेल्या सोसायट्यांमध्ये असलेल्या एका सोसायटीच्या सीसीटीव्हीत असणाऱ्या संशयिताशी जमदारेचे साधर्म्य जुळत असल्याचे पाहून त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली.
जमदारे हाच या प्रकरणाचा सूत्रधार असू शकतो, अशी दाट शक्यता सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. जमदारे हा कायम नशेत असतो. त्याला ड्रग्ज आणि दारूचे व्यसन असल्याने तो कायम नशेत राहतो, असे रामानंद यांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र बंटी पवार आणि जमदारे यांच्यावर सोमवारी सिंहगड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यावरून जमदारे हा बंटी पवारचा साथीदार आहे, हे यावरून सिद्ध होते. दरम्यान, सिंहगड रोड परिसरात गाड्या पेटवून दिल्याप्रकरणी कुणीही आरोपी अद्याप स्पष्ट झाला नसून, अनेकांकडे चौकशी सुरू असल्याचे पाठक यांनी सांगितले. हे कृत्य कोणी माथेफिरूने केले नसून, पूर्वनियोजित कट असल्याचे सांगितले. यामुळे परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांकडे पोलिसांच्या तपासाची सूत्रे फिरली आहेत.