पुणे – तुळशीबागेतील वाकणकर वाड्यास सोमवारी(ता.3) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत कटलरी साहित्याचे दुकान आणि कपड्याचे गोडाऊन खाक झाले. आगीचे कारण निश्चित समजू शकले नाही. मात्र, यात मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवार पेठेतील तुळशीबागेत केदार पंढरीनाथ वाकणकर यांचा वाडा आहे. ते सध्या राहण्यास नवी पेठेत आहेत; परंतु या वाड्यात त्यांचे जनरल स्टोअर्स आणि कपड्याचे गोडाऊन आहे. वाड्यालगत इमारतींमध्ये नागरिक राहत असून कपडे, स्टेशनरी आणि कटलरी साहित्याची दुकाने आहेत.
वाकणकर वाड्यास सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या नऊ गाड्या आणि दोन पाण्याचे टॅंकर तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी प्रथम शेजारच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. इतरत्र आग लागू नये, याची खबरदारी घेत अग्निशामक दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा केला. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रेय नागलकर, स्टेशन अधिकारी प्रकाश गोरे, समीर शेख, राजेश जगताप, संजय रामटेके, प्रकाश उमराटकर, गजानन पाथरूडकर, विजय भिलारे यांच्यासह इतर जवानांनी अथक प्रयत्न करीत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली, असे मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे अधिकारी गोरे यांनी सांगितले.