तिहार तुरुंगातून , भूयार खोदून कैदी पळाला….
नवी दिल्ली – देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातून भूयार तयार करुन पळून जाण्यात एक कैदी यशस्वी झाला तर त्याचा दुसरा साथीदार मात्र पळतापळता पकडला गेला या घटनेने भारतीय तुरुंग व्यवस्थेला शरमेने मान खाली घालावी लागणार आहे . रविवारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी एका कैद्याला घटनास्थळीच पकडले मात्र दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनूसार, जावेद आणि फैजान हे दोन कैदी तुरुंग क्रमांक 7 मध्ये कैद होते. या दोघांनी तुरुंग क्रमांक 7 आणि 8 येथे भूयार तयार केला. तुरुंगातील नाल्यातून जावेद फरार झाला, तर फैजानला पकडण्यात आले.आशिया खंडातील सर्वात मोठा तुरुंग अशी ख्याती असलेल्या तिहार तुरुंगातून कैद्यांनी पळून जाण्याची ही आजपर्यंतची तिसरी घटना आहे. याआधी बिकनी किलर नावाने कुप्रसिद्ध चार्ल्स शोभराज याने तिहारची अभेद्यता भेदली होती. त्याच्याही आधी फूलनसिंह हत्याकांडातील आरोपी शेरसिंह राणाने तुरुंगातून पोबारा केला होता.
तिहार तुरुंग देशातील सर्वात सुरक्षित तुरुंग मानले जाते. येथे देशातील मोठ-मोठ्या प्रकरणातील आरोपी आणि दोषींना ठेवण्यात आलेले आहे. सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांसह सीआरपीएफ आणि तामिळनाडू स्पेशल फोर्सचे जवान तैनात असतात. तुरुंगातून पळून जाण्यासाठी दोन्ही कैद्यांनी मॅकनिकल टूल्सचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. जावेद आणि फैजानने तुरुंग क्रमांक 7 आणि 8 येथून तुरुंगातील गुप्त नालीपर्यंत भूयार तयार केले. त्यानंतर नालीतून जावेद फरार झाला. मात्र या गुप्त नालीची माहिती तुरुंग प्रशासनाशिवाय कोणालाच नाही, असेही समोर आले आहे.