बारामती- तिरुपतीकडे निघालेल्या बारामती तालुक्यातील सात जणांचा कर्नूल ते चित्तूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुर्देवी अंत झाला. वीस ते पंचवीशीतील युवकांच्या अकाली मृत्यूने बारामती तालुक्यावर आज शोककळा पसरली.
बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे व देऊळगाव रसाळ येथील ऋषीकेश पोपट गवळी, अनिल सत्यवान गवळी, शेखर बापूराव गवळी, सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, नागेश बाळासाहेब खराडे हे त्यांच्याकडील स्कॉर्पिओ गाडीतून (एमएच 42- के- 2443) तिरुपतीक़डे निघाले होते. पहाटे अडीचच्या सुमारास कर्नूल चित्तुर महामार्गावर आंध्रप्रदेशातील चांगलामारी गावानजिक ही स्कॉर्पिओ अपघातग्रस्त झाली. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपशिल अद्याप प्राप्त झाला नाही.
आज सकाळी बारामतीत ही बातमी येऊन धडकल्यावर देऊळगाव रसाळ व उंडवडी गावावर शोककळा पसरली.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती व अपघाताचे ठिकाण यांच्या सतत संपर्कात राहून अजित पवार यांनी एकीकडे स्थानिक कुटुंबाना धीर तर दिलाच पण यंत्रणा हलवून त्यांनी मदतीसाठीही सातत्याने प्रयत्न केले.