मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने चित्रपट निर्मिती संस्थांना अनुदान देण्यात येते. शनिवारी सहा चित्रपट निर्मिती संस्थांना अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींना पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.
अनुदान वाटप करण्यात आलेल्यांमध्ये मे.व्ही. पतके फिल्म्स (चित्रपट-तानी), मे.चिन्मय प्रॉडक्शन (चित्रपट-भाकरखाडी 7 किमी), मे.वृंदावन फिल्म एंटरटेन्मेंट (चित्रपट-गोविंदा), मे.व्हाईट पेपर कम्युनिकेशन (चित्रपट-तप्तपदी), मे. सह्याद्री मोशनपिक्चर्स (चित्रपट-जरब) आणि प्रेस फोटोग्राफर म्हणून पुण्यात कारकीर्द घालविलेले संदेश भंडारे यांच्या प्रॉडक्शन चा चित्रपट-म्हादू यांचा समावेश आहे.
श्री.तावडे यांनी आपल्या विभागाच्या कार्यक्रमात मान्यवर, पाहुणे व अधिकारी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन न करता पुस्तक भेट देऊन करावे, असा निर्णय वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याचे या कार्यक्रमात पहायला मिळाले.