मुंबई -भाजप आणि शिवसेना यांच्यातील बिघडलेले संबध पाहता पुढच्या सहा महिन्यांतही महाराष्ट्रावर पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ शकतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार करू, असे विधानही त्यांनी केले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनतर सत्तास्थापनेचा खेळ रंगला असताना त्यात अगदी पहिल्या दिवसापासूनच पवारांची राष्ट्रवादी चर्चेत आहे. राष्ट्रवादीने न मागता भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला. त्यामुळे शिवसेनेची तर कोंडी झालीच शिवाय भाजपलाही शिवसेनेला आणखी बॅकफुटवर ढकलण्यासाठी बळ मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
भाजपला राष्ट्रवादीने एकतर्फी पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता पवारांनी आधीचा सूर बदलला. ‘आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला नाही आणि विरोधही केलेला नाही. सभागृहात भाजपवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर राष्ट्रवादीचे आमदार मतदानात भाग घेणार नाहीत’, असे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले नाही तर पुढच्या सहा महिन्यांतही राज्यावर निवडणुका लादल्या जाऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊनच आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे पवारांनी पुढे स्पष्ट केले.
घोटाळ्यांचे आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी भाजपपुढे शरण गेल्याच्या बातम्या पवारांनी नाकारल्या. भाजप-राष्ट्रवादी ‘गुफ्तगू’चा पृथ्वाराज चव्हाणांचा आरोपही त्यांनी फेटाळल्या. ‘पृथ्वीराज तीन वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा ते काय करत होते. ते झोपले होते का?, असा हल्लाच पवार यांनी चढवला.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार आहे का?, अशी काही जुळवाजुळव होतेय का?, असे विचारले असता पवार यांनी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे उत्तर दिले. अशा जरतरच्या प्रश्नांवर मी उत्तरे देत नाही. काही काँग्रेस नेत्यांना असं वाटत असेल पण पक्षाची ती भूमिका असेल, असे मला वाटत नाही. काँग्रेस पक्ष खरंच याबाबत गंभीर असेल तर जाहीरपणे तसं त्यांनी बोलायला हवं. त्यानंतरच त्यावर चर्चा होऊ शकते, असे पवार म्हणाले. शिवसेनेला आम्ही पाठिंबा दिल्याने पुरेसा आकडा तयार होईल, असे मला वाटत नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केल