पुणे-‘‘चेन्नईवर आलेल्या आसमानी संकटावर मात करण्यात तरुणांचा मोठा सहभाग होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मानवतावादी तरुण चेन्नईच्या मदतकार्यात उतरले. या आपत्तीचे प्रभावीपणे व्यवस्थापन झाले. अशीच मानवतावादी पिढी घडवायची असेल, तर तरुणांमध्ये मानवतेची मूल्ये रुजणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’’ असे मत अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रा. डॉ. व्ही. जी. नारायणन यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसच्या(पीजीडीएम) 31 व्या तुकडीच्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक कार्याध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. या समारंभासाठी जमशेदपूर येथील एक्सएलआरआयचे प्रा. डॉ. शरद शरीन, गोकुलदास एक्सपोर्ट लिमिटेडचे संस्थापक संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम चक्रवर्ती, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश रेवणकर व कॅप्रिहन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रॉबिन बॅनर्जी, माईर्स एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक (ग्रुप कॅप्टन) दीपक आपटे, सहयोगी संचालक डॉ. अमित सिन्हा आदी उपस्थित होते.
रॉबिन बॅनर्जी म्हणाले की, ‘‘जागतिक तापमानवाढ ही एक ज्वलंत समस्या बनली आहे. उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळू लागल्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. त्यामुळे मुंबई आणि कोलकात्यासारखी महानगरेही पाण्याखाली बुडतील. कार्बन डायऑक्साईडच्या थराने संपूर्ण पृथ्वी वेढली गेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी उष्णता अडकून राहते. ते याचे कारण आहे. यंत्रमानवामुळे काही लोक बेकार होणार असले, तरी काही नव्या संधीसुद्धा निर्माण होणार आहेत.’’
उमेश रेवणकर म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष करिअरमध्ये आल्यानंतर स्वत:मध्ये विश्वासपात्र नेतृत्त्व विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. कष्ट, प्रामाणिकपणा यासह करुणा आणि संवेदनशीलता आपल्यात कायम असायला हवी. ग्राहकांचे समाधान कसे होईल, यावर आपला भर असला पाहिजे. नव्या कल्पना आणि उद्योगांच्या उभारणीच्या अनेक संधी आहेत. त्याचा लाभ घेण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे.’’
प्रा. डॉ. शरद शरीन म्हणाले, ‘‘शिक्षणाचे खाजगीकरण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा प्रसार होत आहे. याचा देशाच्या प्रगतीला हातभार लागेल.’’