पुणे—देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे असे सर्वजन म्हणतात मात्र, त्यांच्या हातात कोणी देश देत नाही. सध्या
देशात जे काही सुरु आहे ते बघता तरुणांच्या हातात देश देण्याची खरच वेळ आली आहे असे मत प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ
डॉ. राजीव शारंगपाणी यांनी व्यक्त केले.
पुण्यातील जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख या दोन महाविद्यालयीन युवकांनी केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या
सायकल प्रवासावर आधारित, ‘काश्मीर ते कन्याकुमारी – सायकल प्रवास’ या राहुल रायकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. शारंगपाणी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक विकासनाना दांगट पाटील, जिल्हा
परिषद सदस्य अमोल नलावडे, सोहम इंडस्ट्रीजचे मधुकर बनकर, पुस्तकाचे लेखक राहुल रायकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. शारंगपाणी यांनी जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख या दोन तरुणांनी केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल
प्रवासात त्यांनी दिलेल्या पर्यावरणाचा संदेशाचा गौरव करत ठराविक वयात अशा प्रकारचा ‘मॅड’पणा केलाच पाहिजे
असे नमूद केले. आत्ताच्या तरुण पिढीचे विचार बघता देश त्यांच्या हातात देश देण्याची आवश्यकता आहे असे सांगून डॉ.
शारंगपाणी म्हणाले, म्हातारे झाले म्हणजे शहाणपण येत नाही. वयाने फक्त अनुभव वाढतो, शहाणपण नाही. कोणत्याही
वयात या मुलांसारखी गोष्ट करता आली पाहिजे. त्यासाठी आपले वय झाले असे कोणी समजता कामा नये.
आयुष्याची मजा ही मृत्यूकडे तोंड करून नाही तर पाठ करून चालण्यात आहे, म्हणजे आपोआप वाट दिसते. या दोन
युवकांनी केलेल्या ‘मॅड’पणा सारखा ‘मॅड’पणा सर्वांनी करावा. त्यामध्ये अपयश आले तर काही बिघडत नाही. तुम्ही
काहीतरी करताय हे तुमचे यश आहे. आचरटपणा करणारी माणसे आवश्यक आहेत. धोका घेण्यातच खरी आयुष्याची
मजा आहे. मर्यादा न सोडता धोका घेतला तर त्याने आयुष्य सुंदर होते असेही ते म्हणाले.
विकासनाना दांगट पाटील म्हणाले, या दोन युवकांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल
प्रवास केला ही अभिनंदनीय बाब आहे. या युवकांसारखी आजची तरुण पिढी सद्मार्गाला लागली तर स्व. डॉ. अब्दुल
कलाम यांच्या स्वप्नातील २०२० साली भारत महासत्ता नक्की बनेल. सध्या नदीचे प्रदुषण, वाहनांमुळे होणारे प्रदुषण या
समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, त्याविरोधात सर्वांनी जबाबदारी घेऊन एकत्रितरित्या काम केले तर नक्की परिवर्तन घडू
शकते असे त्यांनी सांगितले.
अमोल नलावडे म्हणाले, काहीतरी चांगले घडण्यासाठी वेडे व्हावे लागते हे या दोन तरुणांनी सिध्द केले आहे. आजच्या
नवीन पिढीत देशात चांगले घडविण्याची ताकद आहे असे त्यांनी नमूद केले.
मधुकर बनकर म्हाणाले, आपला देश जर जवळून बघायचा असेल तर पायी किंवा सायकलने परवस करून प्रवास करा.
जात धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारी माणसे या प्रवासात आपल्याला भेटतात.
राहुल रायकर यांनी पुस्तकाबद्दल माहिती देऊन या दोन युवकांच्या प्रवासातील काही किस्से सांगितले.
जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख यांनी त्यांच्या प्रवासातील अनुभव कथन केले. निष्कारण वेळ घालवणाऱ्या गोष्टींमध्ये
न अडकता चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यास त्याचा फायदा देशाला, समाजाला व आपल्या स्वत;ला होतो असा संदेश
त्यांनी यावेळी दिला.
डिसेंबर महिन्यात जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख यांच्यासह त्यांचे अजून चार मित्र दिब्रुगड (आसाम) ते गुजरात असा
सायकल प्रवास करणार आहेत त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन …..ढगे व …..जगदाळे यांनी केले.

