पुणे:
‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि ‘जाणीव सामाजिक संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आगमन झालेल्या तुकाराम आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात जनजागृती करण्यासाठी ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ चे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’च्या वतीने डॉ. सायली कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी आणि जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने मधूकर बिबवे, राजेंद्र शेलार, प्रमोद पाटील यांचा सहभाग होंता.
दिंडीमध्ये 300 ते 350 विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रातिनिधीक स्वरुपाची होळी करण्यात आली. तंबाखूमक्तीची ही पताका आपल्या महाराष्ट्रात उंचविण्यासाठी आणि तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी या उपक्रमात नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता.
आज शुक्रवारी 10 जुलै 2015 रोजी दुपारी वाकडेवाडी येथून ही दिंडी माउलींच्या पालख्यांच्या आगमनापूर्वी काढण्यात आली होती. दिंडीची सांगता अलका टॉकीज चौकात झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, खासदार अनिल शिरोेळे, आयुक्त कुणाल कुमार, नगरसेवक योगेश टिळेकर, सुनंदा गडाळे यांनी दिंडीचे स्वागत केले. अलका टॉकीज चौकात गोल रिंगण करून तंबाखूमुक्तीचा संदेश देणार्या घोषणा देण्यात आल्या व ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ याविषयी जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात आली.
यावर्षी ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनामुळे होणार्या जीवनहानी बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अभियानाच्या पुढील टप्यात ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ म्हणून झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका ‘जय मल्हार’ मधील खंडोबाची भूमिका करणारे कलाकार देवदत्त नागे आणि स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील कल्याणी ची भूमिका करणारी कलाकार जुई गडकरी हे या अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.