पुणे-
” तुमच्या पहिल्याच प्रयत्नांना खूप चांगले यश मिळाले आहे. तुमचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे हे यश तुम्ही जरूर टिकवून ठेवा” या शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी ‘नागरिक’ चित्रपटाच्या ‘टीम’ ला आशीर्वाद दिले. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘नागरिक’ चित्रपटाने तब्बल पाच पुरस्कार मिळवून बाजी मारली आहे. ‘नागरिक’ चित्रपटात डॉ. श्रीराम लागू यांचीही महत्वाची भूमिका आहे. त्यानिमित्त ‘नागरिक’ चे निर्माते सचिन चव्हाण, दिग्दर्शक जयप्रद देसाई, प्रमुख कलाकार सचिन खेडेकर, माधव अभ्यंकर आणि मिलिंद सोमण यांनी हे पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना त्यांच्या नवसह्याद्री सोसायटीतील घरी जाऊन दाखविले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच यानिमित्ताने या चित्रपटाच्या प्रमोशनचा शुभारंभही केला.
हे पुरस्कार पाहून डॉ. श्रीराम लागू अतिशय खुश झाले. कितीतरी वेळ हातात पुरस्काराची बाहुली घेवून तिच्याकडे पाहत या यशाबद्दल त्यांनी ‘नागरिक’ चित्रपटाच्या ‘टीम’ चे कौतुक केले. आणि पहिल्याच चित्रपटाला एवढे पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांचीच जबाबदारी खूप वाढली आहे याची जाणीवही त्यांनी करून दिली. ”नवीन पिढीतील कलाकारांबरोबर काम करताना कसे वाटते?” या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. लागू म्हणाले, त्यांच्याबरोबर काम करताना मला नेहमीच माझ्याबद्दल ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ याची प्रचिती येते. घरी मी सहसा चित्रपट पाहत नाही कारण त्यासाठी आवश्यक असलेली अद्यावत यंत्रणा माझ्याकडे नाही मात्र मला सगळेच चित्रपट आवडतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिग्दर्शक जयप्रद देसाई, तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार सचिन खेडेकर आणि मिलिंद सोमण यांनी यावेळी त्यांना चित्रीकरणाच्या काही प्रसंगाची आठवण करून दिली आणि तुमच्याबरोबरचे काही ‘सीन’ खूपच चांगले झाल्याचे सांगितले. त्यावर तातडीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. श्रीराम लागू मिश्किलपणे म्हणाले, ”का नाही होणार? अहो. मी खूप चांगला अभिनेता आहे” त्यांच्या या प्रतिक्रियेवर साहजिकच हास्याची खसखस पिकली. त्यानंतरही बोलताना डॉ. श्रीराम लागू यांनी अनेकवेळा आपल्या नर्मविनोदी स्वभावाचे दर्शन घडविले. थोड्या वेळाने डॉ. श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम याही या कौतुक सोहळ्यात सहभागी झाल्या. त्यांनी उपस्थितांना आणि खास करून ‘नागरिक’ चित्रपटाच्या ‘टीम’ ला बर्फीचे वाटप करून पुरस्काराबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट गीते आणि सर्वोत्कृष्ट छायांकन असे महत्वाचे पाच पुरस्कार मिळवून ‘नागरिक’ चित्रपटाने राज्य शासनाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.