मायानगरी मुंबईच्या गर्दीत एकमेकांना लोटत, वाट काढत माणसं जेंव्हा पुढे सरकत असतात तेव्हा त्यांच्या सोबत पुढे सरकत असतात ती त्यांची स्वप्ने. सतत धावणारं शहर अशी या मुंबईची ओळख. पण हे शहर कशामागे धावतं? असा प्रश्न विचारलं तर एकच उत्तर मिळेल.. स्वप्नांच्या मागे. इथे जणू स्वप्नांची एक स्पर्धाच चाललेली असते. ही स्पर्धा असते या शहरात आपली ओळख निर्माण करण्याची, या शहरात नाव कमावण्याची आणि या स्पर्धेत आपल्या स्वप्नाचं अस्तित्व कसं टिकून राहील याची. स्वप्नांचा हा प्रवास या शहरात दिवस रात्र अविरत चालत असतो. कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. या शहरातील अशाच एका स्वप्नाची आणि एका अनोख्या प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार ‘डबल सीट’ या आगामी मराठी चित्रपटातून. अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय समीर विद्वांस या आजच्या पिढीच्या तरूण दिग्दर्शकाने. रणजीत गुगळे यांचे ह्युज प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि अनिश जोग यांच्या प्रतिसाद प्रॉडक्शन्स ची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्सची आहे. यावर्षी ‘लोकमान्य-एक य़ुगपुरूष’, आणि ‘टाइमपास २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांसह ‘किल्ला’ सारख्या आशयघन चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करणारे एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स ‘डबल सीट’ हा नवा चित्रपट येत्या १४ ऑगस्टला प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा शानदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटाच्या टीमसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘डबल सीट’ या चित्रपटाची कथा आहे मुंबई शहराची आणि या शहरात राहणा-या अमित आणि मंजिरी या मध्यमवर्गीय नवदाम्प्त्याच्या स्वप्नांची. अमित एका कुरिअर कंपनीत नोकरीला आहे तर मंजिरी लाईफ इन्शुरन्स एजंट. मुंबईतील अनेक कुटुंबाप्रमाणे लालबाग-परळ भागातील एका जुन्या चाळीत एकत्र कुटुंबात राहणारं हे जोडपं. मुंबईच्या गर्दीत रोजच्या धकाधकीच्या जीवनात जगण्याची एक विचित्र शर्यत सुरू असते. या शर्यतीत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अमित आणि मंजिरीही सहभागी आहेत. खरं तर या शर्यतीत प्रत्येकालाच पुढे रहायचं असतं आणि जिंकायचंही असतं. यात जिंकण्यासाठीचं कुणाचं ध्येय असतं ते चांगली नोकरी, कुणासाठी एखादा व्यवसाय तर कुणासाठी स्वतःचं हक्काचं घर. मुंबईसारख्या मायानगरीत अगदी उपनगरांत का होईना पण स्वतःचं घर असावं जिथे आपल्याला आपली ‘स्पेस’ जपता येईल असं स्वप्नं बघणारी लाखो जोडपी या शहरात आहेत. अमित आणि मंजिरीचंही असंच एक स्वप्न आहे, स्वतःच्या घराचं. कोणताही लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्यासाठी प्रवास करण्याची तयारी असणंही तेवढंच गरजेचं. अशाच एका प्रवासासाठी अमित आणि मंजिरी निघाले आहेत. हा प्रवास आहे त्यांच्या स्वप्नांचा. या प्रवासात काय अडचणी येतात? कोणती संकटे येतात? त्यावर ते मात करतात की माघार घेतात ? या प्रवासात ते एकटे पडतात की त्यांना सहप्रवासीही मिळतात? याचीच कथा म्हणजे ‘डबल सीट’ हा चित्रपट.
या चित्रपटात अमितची भूमिका साकारलीये अंकुश चौधरीने तर मंजिरीच्या भूमिकेत आहे मुक्ता बर्वे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. याशिवाय चित्रपटात विद्याधर जोशी, वंदना गुप्ते, शुभंकर तावडे, संदीप पाठक, आसावरी जोशी आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची अतिशय साधी सरळ पण तेवढीच प्रभावी अशी कथा आणि पटकथा आहे क्षितीज पटवर्धन आणि समीर विद्वांस यांची तर संवाद क्षितीज पटवर्धन यांचे आहेत . चित्रपटाचं संकलन केलंय चारूश्री रॉय यांनी तर कला दिग्दर्शन सिद्धार्थ तातुसकर यांचं आहे. धावणा-या मुंबईला आपल्या छायाचित्रणात सुरेखपणे टिपलंय छायालेखक अर्जुन सोरटे यांनी. या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत हृषिकेश-सौरभ –जसराज या संगीतकार त्रयींनी. यात मुंबईचं वर्णन करणारं ‘मोहिनी’ आणि रित्या सा-या दिशा हे भावस्पर्शी गीत लिहिलय क्षितीज पटवर्धन यांनी, ‘मन फिरूनी फिरूनी’ हे भावपूर्ण गीत शब्दबद्ध केलंय समीर विद्वांसने तर ‘किती सांगायचंय मला’ हे प्रेमाच्या अबोल भावना व्यक्त करणारं गीत लिहिलंय स्पृहा जोशीने. याशिवाय चित्रपटात ‘मन सुद्ध तुजं गोष्ट हाये प्रिथवी मोलाची’ हे सुप्रसिद्ध गाणं नव्या शैलीत ऐकायला मिळणार असून ते सुप्रसिद्ध संगीतकार – गायक अजय गोगावले यांनी गायलं आहे. ही गाणी व्हिडिओ पॅलेसच्या माध्यमातून श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत.
स्वप्नांची नगरी असलेल्या या मुंबापुरीची आणि यातील एका सर्वसामान्य जोडप्याची, त्यांच्या कुटुंबाची कथा आणि त्यांच्या स्वप्नांचा ‘डबल सीट’ प्रवास येत्या १४ ऑगस्टपासून एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.