ठाणे : मुंबईलगतच्या ठाणे शहराचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी शासन संवेदनशील असून शक्यतो या वर्षभरातच ठाणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात येईल तसेच हे काम मुंबई मेट्रोप्रमाणे न रेंगाळू देता निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या टाऊन हॉल व खुल्या प्रेक्षागृहाचे (Amphitheater) लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.
कोणत्याही शहरातील टाऊन हॉल हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा साक्षीदार असतो. ठाण्यातील हा टाऊन हॉल देखील सामाजिक, राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
इमारतींचा पुनर्विकास
मुख्यमंत्री म्हणाले की, ठाणे शहरातील अनधिकृत व अधिकृत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी .33 इतका एफ.एस.आय देण्यासाठी शासन अनुकूल असून इम्पॅक्ट ॲसेसमेंट तयार आहे. याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल आणि हा प्रकल्प राज्यातील इतर शहरांसाठी देखील पथदर्शी म्हणून राबविण्यात येईल. यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणे शक्य होईल.
उत्सवात राजकारण आणू नये
कोणत्याही उत्सवात राजकारण आणू नये, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ठाणे, मुंबई ही शहरे सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच पुढे असतात. आपल्या संस्कृतीत दहीहंडीला विशेष महत्त्व आहे. सामाजिक व सांस्कृतिक अभिसरणात या उत्सवांना अधिक महत्त्व असून असे उत्सव पारंपरिक पद्धतीने, कायद्याच्या चौकटीत बसवून साजरे करण्यास कुणी अडवलेले नाही. परंतु असे उत्सव साजरे करू नका अशा धमक्या जर कुणी देत असतील तर पोलीस योग्य ती कार्यवाही करतील.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, अडगळीत पडलेल्या वास्तूला जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन रूप देऊन या वास्तूला वैभव प्राप्त करून दिले आहे. ठाणे हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर असून याठिकाणी कलावंताना, कला रसिकांना या वास्तूचा उपयोग करण्याची संधी मिळणार आहे. ठाण्यासाठी क्लस्टरची योजना प्राधान्याने राबविण्यासाठी राज्य शासनाने पाउले उचलावीत, यात मोडकळीस आलेल्या अनधिकृत इमारतीबरोबरच अधिकृत इमारतीचा समावेश करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मेंटल हॉस्पिटलला खूप मोठी जागा असून विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकासाठी १० एकर जागा दिल्यास ठाण्यातील गर्दीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांनी प्रास्ताविकात या टाऊन हॉलच्या पुनरुज्जीवनामागची भूमिका सांगितली. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या आवाजातील ‘मी टाऊन हॉल बोलतोय’ ही ध्वनिमुद्रिका वाजवण्यात आली. श्री केळकर यांनी या टाऊन हॉलच्या पुनार्निर्माणासाठी प्रयत्न केला होता. त्यांच्या आमदार निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लघुपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन
एक समृध्द वारसा या लघुपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. हा लघुपट जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने केला असून कांचन नायक यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी कलादालनातील चित्र प्रदर्शनाची पाहणी केली आणि मान्यवर चित्रकारांशी हितगुजही केले. नंतर त्यांनी खुल्या प्रेक्षागृहाच्या कोनशिलेचे अनावरणही केले. हा टाऊन हॉल त्याकाळी शासनास दान केलेल्या कावसजी दिवेचा यांच्या कुटुंबियातील सदस्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले. प्रारंभी विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी टाऊन हॉलच्या पुनर्निर्माणात काम केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. नांद्रेकर व वास्तू विशारद दीपक मांडे यांचा देखील मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास खासदार राजन विचारे, कपील पाटील, श्रीकांत शिंदे, आमदार मंदा म्हात्रे, सुभाष भोईर, नरेंद्र मेहता, महापौर संजय मोरे, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
असा आहे पुनरुज्जीवित ठाणे टाऊन हॉल
स्वातंत्र्यपूर्व काळात १९२८ मध्ये ठाण्यातील एक दानशूर व्यक्ती कावसजी दिवेचा यांनी टाऊन हॉल बांधून ब्रिटिशांकडे सुपूर्द केला. या वास्तूचा वापर सार्वजनिक सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होऊ लागला. अल्पावधीतच टाऊन हॉल हे ठाण्यातील सांस्कृतिक घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले.
स्वातंत्र्योत्तर काळात मात्र टाऊन हॉलची ही ओळख मागे पडली. या जागेचा केवळ मर्यादित वापर होऊ लागला. शहरातील नागरिक आणि संस्थांना अत्यल्प दरामध्ये सभागृह उपलब्ध व्हावा हा त्याचा मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्यपूर्व काळात याच उद्देशासाठी वापरली जाणारी ही वास्तू स्वातंत्र्यानंतर मात्र शासकीय गोडाऊन म्हणून वापरली जाऊ लागली होती. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने १९७४ नंतर या सभागृहात रास्त धान्य विक्री दुकान सुरू करण्यात आले होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सं. पां. जोशी यांनी आवाज उठवून रास्त धान्य विक्री दुकानाच्या जंजाळातून मुक्तता केली होती. त्यानंतर निवडणूक साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या सामानाने हे सभागृह भरून गेले होते.
कलादालन व Amphitheatre
समाजातील अनेक स्तरांमधून सातत्याने या दुर्लक्षित वास्तूविषयी मागणी होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने यात पुढाकार घेऊन या हॉलचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. या हॉलला लागूनच असलेल्या मोकळ्या जागी खुले प्रेक्षागृह बांधून कल्पक उपयोग करण्यात आला असून या ठिकाणी सुमारे २०० जण बसून कार्यक्रम पाहू शकतात. या परिसरातील वृक्षांचाही सुशोभीकरणासाठी चांगला उपयोग करून घेण्यात येत आहे. विशेषत: येथील आम्रवृक्षाच्या सभोवताली व्यासपीठाची आकर्षक रचना करण्यात आली आहे.
ठाणे शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव टिकविण्यासाठी पुरातन अशी ही वास्तू ठाणे शहराचे भूषण व्हावी आणि सांस्कृतिक उपक्रमांना या ठिकाणी वाव मिळावा या हेतूने येथील कलादालन समृद्ध करण्यात येणार आहे. या हॉलचा वापर ग्रंथ प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देखील केला जाणार आहे.