पुणे, : विश्रांतवाडी परिसरातील टिंगरेनगरमधील समई हॉटेलमध्ये सुरु असलेली 5 लाख 19 हजार 50 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी महावितरण पोलीस ठाण्यात दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की नगररोड विभाग अंतर्गत विश्रांतवाडी परिसरातील टिंगरेनगरमधील विद्यानगरात समई हॉटेलला महावितरणने वाणिज्यिक वीजजोडणी दिलेली आहे. तथापि, वीजवापराच्या विश्लेषणातून या हॉटेलमधील वीजवापर नोंदीबाबत शंका निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. यात प्राथमिक तपासणीत हॉटेल समईमधील वीजमीटरची गती संथ आढळून आली. त्यानंतर वीजमीटर, सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) पंचनामा करून जप्त करण्यात आले व त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. या वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार करून 29916 युनिटची म्हणजे 5,19,050 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. गुलाबराव कडाळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. एस. जी. घोडके, सहाय्यक अभियंता श्री विकास तायडे तसेच जनमित्र आर. व्ही. गायकवाड, जी. डी. खेडकर आदींनी ही वीजचोरी उघडकीस आणली.
या वीजचोरीप्रकरणी समई हॉटेलचे वीजजोडणीधारक कमल मिरेकर व वीजवापरकर्ता शिवराम राय यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. 2) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.