पुणे-मार्केटयार्ड येथे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत 72 घरे भस्मसात झाले आहेत. घटनास्थळी दोन सिलेंडर फुटल्याने आग पसरत गेली. नागरिकांनी सतर्कता दाखवत 50 पेक्षा अधिक गॅसचे सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या, 13 पाण्याचे टँकर आणि 55 जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
आंबेडकरनगर परिसरात दाटीवाटीने घरे असल्यामुळे घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब पोहोचण्यास विलंब होत होता. आगीचे स्वरुप मोठे असल्याने ती त्वरित आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत नागरिकांना डोळ्यासमोर आपली घरे जळताना पाहावी लागली.
आगीत भस्मसात झालेल्या एका घरात लग्नसराईची लगबग सुरू होती. चार दिवसांवर लग्न आले होते. त्यासाठी भिशीमधून जमा केलेले दीड लाख रुपये कालच घरात आणून ठेवले होते आणि आज सकाळी ही घटना घडली. आगीत संपूर्ण घर तर जळालेच पण कालच आणलेल्या दीड लाख रुपयांचाही कोळसा झाल्याचे सांगताना एका महिलेच्या डोळ्यातील पाणी आटत नव्हते..
रमेश नामक इसमाने रडत रडत त्याची कथा सांगितली. सहा महिन्यांपासून भावाच्या लग्नासाठी मार्केटयार्डात मोलमजुरी करून पैसे गोळा केले होते. दोन दिवसानंतर आम्ही संपूर्ण कुटूंबासह उत्तरप्रदेश येथील घरी जाणार होतो. परंतू आगीने आमचे सर्वस्व हिरावून घेतले. आता माझ्या भावाच लग्न कसं होणार, हे सांगताना तो धाय मोकलून रडत होता.











